Friday, July 30, 2010

सोळावं वरीसं अलकाचं.......

मराठीतील एक श्रेष्ठ मनस्वी, कलंदर कवी श्रीकृष्ण पोवळे हे अलका मासिक काढत असत. अलका मासिकाला वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत होता. तत्कालिन मासिकांपेक्षा वेगळ्या धाटणीचे म्हणून त्याच्या वाचक संख्येमधेही लक्षणीय बदल होत होते. मासिक आणि विशेषांकाच्या विक्रीची व्यवस्था अण्णांकडे असे. मासिकाच्या मांडणीतूनही संपादक आणि त्यांचे सहकारी सातत्याने वेगळेपण राखण्याचा प्रयत्न करीत असत. अशा या अंकाची वाटचाल तब्बल एक दोन नव्हे तर सोळा वर्षांची होत आल्यानंतर तर अंकाचं काम करणार्यांाच्या ठायी कमालीचा उत्साह संचारला होता. हे वर्ष १९५७-५८ असावं. अलकाचं हे सोळावं वर्ष संस्मरणीय व्हावं, अंकाला काही नवा साज देता आला तर पहावं, याचा विचार दिवसरात्र डोक्यात घोळत होता. ..... नवथर वयाचा हा टप्पा साधारणपणे मानवी आयुष्यात कशातर्हे ने स्वीकारला जातो अथवा साजरा केला जातो, हे तर प्रत्येकाच्या प्रकृतीवर अवलंबून असतं म्हणा.. तरीही तो एक आनंददायी काळ असतो, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. बालपणाचे फुलपंखी दिवस संपून आपल्याला आपली ओळख होण्याचा, नवनवीन क्षितिजांनी – मोहांनी खुणावण्याचा तो मोरपंखी मोहमयी काळ असतो. आपण मोठे झालो आहोत, ही मानसिक आणि शारीरिक अवस्थादेखील हुळहुळणारी असते. अलकाच्याही बाबतीत तसंच होतं. फक्त फरक इतकाच की, ते एक मासिक होतं. त्याच्या भावना सोळाव्या वर्षात काय असतील हे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, पण तरीही हा योग असा हातचा दवडायचा तर मुळीच नव्हता. झालं...श्रीकृष्ण पोवळेंनी अण्णांना विचारलं, “अण्णा, आपली अलका आता सोळा वर्षांची झाली. काय विशेष करायचं?” अण्णांच्या विचारांना चालना मिळाली आणि एक मस्तपैकी शक्कल लढवली गेली....नवयौवनाच्या उंबरठ्यावरील अलका. हे तारूण्याचे धुंद, सुगंधी दिवस. दिवाळी जवळ आली तसे घरात अत्तराचे बुदलेच्या बुदले यायला लागले. बुदल्यांचे हे गौडबंगाल आमच्या काही केल्या लक्षात येत नव्हते. अंक तयार झाल्यानंतर त्यावर ह्या बुदल्यांमधील अत्तरांचे फवारेच्या फवारे शिंपडण्यात आले. असा तारूण्याचा बहर ल्यायलेले अलका मासिक सोळाव्या वर्षी प्रकाशित होताना अत्तराच्या सुगंधाने नहातच वाचकांच्या हाती आले. आणि बाहेरगांवी – बाजारात षोडशवर्षीय अलकाचीच चर्चा ऐकू येऊ लागली. अण्णांची ही भन्नाट आयडिया तुफान लोकप्रिय झाली.
आम्हां सर्व मुलांना पोवळ्यांनी नवे कपडे, खूप सारे फटाके घेतले. त्या दिवाळीतल्या नव्या नवलाईचा, अत्तराचा घमघमाट आजही मन मोहरून टाकतो. दिवाळी अंकांच्या इतिहासात अण्णांनी केलेला विलक्षण कल्पक प्रयोग, ना आधी कुणी केला आणि नंतर केल्याचं वाचण्यात आलं.

No comments:

Post a Comment