१९८६ला धनंजय परत पुण्याहून मुबईत आला. एखादं मुल जसं काही कारणास्तव काही काळ घरादारापासून, आपुलकीच्या धाग्यांपासून दूर रहातं आणि नंतर परत येतं ते कायमसाठी, तसं काहीसं धनंजयच्या बाबतीत झालं. त्याचे विखुरलेले लेखक, चित्रकार आनंदाने या परिवारात परत आले. मी मा. यशवंत रांजणकरांना भेटलो आणि कथा देण्याची त्यांना विनंती केली, अर्थातच त्यांनी तत्काळ ती मान्यही केल्याने काम करायला एक हुरूप आला. जरा बिचकतच मी त्यांच्यासमोर मानधनाविषयी बोलणं काढताच ते म्हणाले, “अरे, आपलं नातं हे काका पुतण्याचं आहे. व्यवहार आम्ही शंकररावांशी केला. आम्हाला त्यावेळेस मानधन मिळाले. आता मी धनंजयसाठी, स्वानंदासाठी लिहीन. धनंजय पुन्हा एकदा मुंबईत आला यातच आनंद आहे.”
असाच काहीसा अनुभव चित्रकार र. स, कंटक आणि अन्य काही जुन्या लेखकांना भेटताना आला. ती. अण्णांची पूर्वपुण्याई आणि धनंजयचा इतक्या वर्षांचा दर्जा काय आहे, ते समजत होतं. कंटकांबद्दलची खास आठवण माझ्या बालपणाशी बांधलेली आहे. आठवी, नववीत मी एलिमेंटरी, इंटरमिजिएटच्या ड्रॉइंग परीक्षांना बसलो असताना कंटक पतीपत्नींनी मला मोलाचे मार्गदर्शन केले होते. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांचे इंपोर्टेड कलर ब्रश, रंग त्यांनी मला वापरायला दिले होते. मी चितारलेलं सूर्यफुल, जास्वंदी, निसर्गचित्रं यांचंही त्यांनी कौतुकच केलं.. म्हटलं तर किती छोटे छोटे प्रसंग...पण मनावर नकळतच किती कायम ठसा उमटवून जातात नं.
काळाप्रमाणे बदलणं आवश्यक असतं. धनंजयला अधिकाधिक वाचकाभिमुख करण्यादृष्टीने तेव्हा फॉर्मात असलेल्या लेखकांना भेटलो. यात सायन्स टुडेचे संपादक डॉ. बाळ फोंडके, दक्षताचे संपादक व.कृ. जोशी, सुहास शिरवळकर, रामचंद्र सडेकर, सुरेश वैद्य, चिंतामणी लागू.....अशा आणि कितीतरी जणांनी धनंजयसाठी लिहायला सुरवात केली. यामुळे पुन्हा एकदा धनंजयला बहर आला. जुन्या वाचकांना नवीन वाचक येऊन मिळाले आणि वाचकांचा प्रवाहो चालला.... एकीकडे आपण वाचकवर्ग कमी झाल्याची ओरड ऐकतो असतो. परंतु मला अभिमानाने सांगावंस वाटतं, की धनंजयची प्रिंट ऑर्डर, वाचकसंख्या दिवाळी २००९ मध्ये १९६९- ७० च्याही पुढे गेलेली आहे.... हे काही क्षणात घडलेलं मिरॅकल नाही, ते आहे टिमवर्क! तुमच्यासारख्यांच्या साथीने आकाराला आणि प्रत्ययाला आलेलं.
No comments:
Post a Comment