Friday, July 16, 2010

वेलकम टू धनंजय फॅमिली !


धनंजय शब्द उच्चारताच क्षणात डोळ्यांसमोर साहस, शक्ती, शौर्य, युद्ध, हेर, रहस्य, संदेह असे विषय येतात. धनंजय म्हणजे अर्जुन आणि मराठी रहस्यकथा वाचक प्रेमींसाठी धनंजय – छोटू जोडी. सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखक बाबुराव अर्नाळकर यांच्या वाचकप्रिय नायकांमध्ये धनंजयला मानाचे आदराचे स्थान आहे. कदाचित या नावाने - व्यक्तिमत्त्वाने भारावून आकर्षित होऊन प्रकाशक आदरणीय शंकरराव कुलकर्णी (अण्णा) यांनी धनंजय मासिक १९६१ साली सुरु केले. रहस्यकथांचा बादशहा असेच धनंजयला संबोधले जायचे.

दिवाळी २०१० म्हणजे धनंजयचे ५० वे वर्ष – सुवर्णमहोत्सवी वर्ष.

१९६१ ते २०१० असा वेगळ्या विषयांवरील या मासिकाचा प्रदीर्घ प्रवास आणि तोही आलेख उंचावणारा. ग्रेट. आनंद आहेच त्याचवेळी मागे वळून पाहताना खूप आठवणी येतात. आत्तापर्यंत फक्त धनंजयमधून - प्रिंट मिडीयातून संवाद करायचो.

आजपासून सर्वांशी आजच्या माध्यमातून नातं जोडूया.....

रहस्य- गूढ या विषयांना दुय्यम स्थान मिळत असल्याकारणाने त्या विषयांना प्राधान्य मिळावे आणि लेखकांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने १९५५ मध्ये शंकरराव कुळकर्णी रहस्यरंजन मासिक काकतकर यांच्यासोबत एकत्रित काही वर्ष काढायचे.

आपल्या सर्वांना एकमेकांशी मस्त बिनधास्त गप्पा मारायच्या आहेत. निमित्त धनंजयचं असलं तरी विषयाला बंधन आसायलाच हवं असं नाही. कदाचित मला माहीत नसलेले धनंजयला पूरक असे नवीन विषय तुमच्याकडून मिळतील. धनंजयचे आधीचे अंक पाहिलेत तर लक्षात येईल की, आपल्या लेखकांत ५० टक्क्यांहून अधिक साहित्य नवोदित लेखकांचे असते. भन्नाट विषय त्यांच्याचकडून मिळतात .लेखनाची स्टाईल एकदम फ्रेश आजची. एक नक्की धनंजयला नवीन मित्र परिवार मिळणार.

वेलकम टू धनंजय फॅमिली.

2 comments:

  1. निवडक धनंजयसाठी मनापासून शुभेच्छा
    शेखर जोशी

    ReplyDelete
  2. धन्यवाद, शेखर...

    ReplyDelete