यंदा धनंजय दिवाळी अंकाचं सुवर्णमहोत्सवी वर्ष. त्यानिमित्ताने अनेक वर्षांचा स्नेह असलेल्या राजेंद्र प्रकाशनाच्या श्री. राजेंद्र शंकरराव कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी नीलिमा कुलकर्णी यांची त्या अंकाबद्दलची, प्रकाशनव्यवसायाबद्दलची ५० वर्षे अव्याहत सुरू असलेली अखंड साधना आता या ब्लॉगच्या रूपात - अनुराधा परब
Saturday, July 17, 2010
धनंजय चित्रपट......
पटकन आठवण येते ती फार पूर्वीच्या “धनंजय” चित्रपटाची. बाबुराव अर्नाळकरांच्या कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटाकडून रहस्यकथाप्रेमींना खूप अपेक्षा होत्या. पण हा चित्रपट सो सो च होता. याचं संगीत सी.रामचंद्र यांचं होतं. आणि ते स्वत: च नायकाच्या म्हणजेच धनंजयच्या भूमिकेतही होते. हं.......पण त्यांना म्हणावं तसं काम काही ते जमलेलं नव्हतं. परंतु त्यांचं उंच, धिप्पाड व्यक्तिमत्त्वं अजूनही डोळ्यांसमोर आहे. कमर्शियली हा चित्रपट फ्लॉप गेला असणार, मी तर त्यावेळेस अगदीच लहान होतो हो... मात्र गिरगांवातल्या मॅजेस्टिक थिएटरबाहेर लावलेलं व्हायोलिन वाजविणार्याे सी. रामचंद्रांचं पोस्टर अद्यापही लख्खं स्मरणात आहे. “जीवाच्या सखीला कितीदा पुकारू, किती साद घालू, किती हाक मारू,” हे त्यांच्या अवीट संगीताने नटलेलं गाणं कानात रूंजी घालतंय.
आठवणी म्हणजे वेगवान टाईम मशिनच. त्यात बसणं आपल्या हाती नसतंच मुळी. क्षणात त्या कुठल्याकुठे आपल्याला नेतात आणि त्या प्रसंगांमधे रमताना वेळ कसा भर्रकन सरतो.......कळतच नाही...!
टू हेल अॅण्ड बॅक
अतिशय गाजलेला आणि आजही लोकप्रिय असलेला युद्धपट. नायक “ऑडी मर्फी” स्वत: त्या महायुद्धात होता. त्याने स्वत चीच भूमिका त्यात साकारली आहे. त्यामुळे आपोआपच त्या चित्रपटाला एक इमोशनल टच आलाय.
युद्ध संपल्यावर त्याला शौर्यपदक मिळतं. पदक स्वीकारत असताना त्याच्या नजरेसमोर युद्धात वीरगती मिळालेल्या त्याचे मित्र येतात आणि त्यांच्या आठवणीने त्याचे डोळे पाणावतात.
आज अगदी हिच अवस्था माझीही झाली आहे. यंदाचं हे “धनंजय” चं सुवर्णमहोत्सवी वर्ष. साहजिकच, या वर्षीच्या धनंजयची तयारी करताना मन अधिक कातर झालंय. या दिवाळी अंकाची जुळवाजुळव करतेवेळी ती. शंकरराव कुळकर्णी (अण्णा), आई (इंदूताई) आणि या मासिकासाठी योगदान दिलेल्या आणि आज आपल्यात नसलेल्या लेखकांची हटकून याद येतेय.
आपल्या सगळ्यांचंच असं होतं नाही! आनंदाच्या आणि दुखा: च्या क्षणी आपल्यातील प्रत्येकाला आठवण सतावते ती आपल्याजवळ नसणार्यां ची.... एकट्या मनाला या आठवणीच आगळी उभारी देतात...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment