Wednesday, July 21, 2010

पन्नास वर्षांचं नातं....

१९६१ साली धनंजयची सुरवात झाली. कल्पना अर्थातच ती. अण्णा म्हणजे शंकरराव कुळकर्णींची. कविवर्य श्रीकृष्ण पोवळे, प्रसिद्ध लेखक – संपादक बा.द. सातोस्कर (दै. गोमंतक), यशवंत रांजणकर, र.स. कंटक अशा सहृदांची साथ त्यांना यात लाभलेली. विषयाच्या मांडणीपासून ते अगदी सादरीकरणापर्यंतच्या वैविध्यामुळे सुरवातीपासूनच धनंजयला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. पहिली १४ वर्षे आपण मुंबईहून अंक काढीत असू. त्यानंतर ११ वर्षे पुण्याहून सदानंद प्रकाशनचे स.म. खाडिलकर हा अंक काढायचे. अण्णांची प्रकृती ठिक नव्हती, तशातच आर्थिक अडचणींचे तर डोंगर समोर उभे ठाकलेले होते. धनंजय सारखा वाचकप्रिय अंक बंद करणं हे देखील योग्य नव्हतं. कुठल्याही नियतकालिकामधे शीर्षक चालू राहणं, अस्तित्वात असणं, वाचकांसमोर ते सतत झळकणं आवश्यक असतं. म्हणून ते काही काळ पुण्यातून काढण्यात आलं. अंकाचा मालकी हक्क आपलाच असला तरी तो काही काळापुरता करार होता. तो आपल्या हातून अन्य कुणाहाती सोपवताना ती. अण्णांना किती यातना झाल्या असतील, आपण समजू शकतो. कदाचित, अण्णांचा आतला आवाज त्यांना सांगत असावा, की अंक नक्कीच परत मुंबईत येईल आणि तो आपणच काढू.
२८ ऑगस्ट १९७७ (नारळी पौर्णिमा) ला अण्णा गेले. मी त्यावेळेस दुबईला होतो. माझं दुबईला जाणं तेव्हाच अत्यावश्यकच बनलं होतं. प्रकाशन व्यवसाय आणि आर्थिक बाजू यांत नेहमीच रस्सीखेच असते. कल्पनांना पंख लावून भरार्याौ मारणं सोपं वाटत असलं तरीही त्यांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पैशांचं पुरेसं पाठबळ असणं आवश्यकच असतं. आणि ते पुरेसं नसतानाही जिद्दीने घेतला वसा नेटाने तडीस न्यायचा तर मग जोखीम पत्करण्याइतकं वाघाचं जीगर हवं. ते अण्णांकडे होतं. मोठ्या नेमाने आणि प्रामाणिकपणे त्यांनी अंकाचे काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. पण झालं असं की, एका बाजूला आर्थिक मेळ बसेनासा झाला आणि कर्जाचे आकडे वाढायला लागले. मी आर्किटेक्ट झालो होतो. आणि या परिस्थितीतून घराला – कुटुंबाला बाहेर काढायचं या निर्धाराने मी दुबईला गेलो. वडीलांजवळ आम्हा दोघांपैकी एकाने असणं गरजेचं असल्याने माझ्या मोठ्या भावाने ती जबाबदारी हिमतीने पेलली. त्यानेही एकीकडे नोकरी सांभाळत घर जपलं. माझा मोठा भाऊ मोहन आणि मी (राजेंद्र कुळकर्णी) दोघांनी घरच्या जबाबदार्याे अशा आपणहून स्वीकारल्या होत्या.
४ जानेवारी १९८६ ला मी मुंबईला कायमचा परतलो आणि दुसर्याय दिवसापासून कामाला सुरवात केली. धनंजय व चंद्रकांत परत मुंबईला आणले. या सगळया घडामोडींदरम्यान माझं लग्न ठरलं होतं. परतल्यानंतर लग्न झालं आणि या सगळ्या डोलार्या.ला सावरायला दोनाचे चार हात कामी आले. त्यात दोन आणखी लहान हातांची भर पडली , ती होती चि. कौस्तुभ आणि चि. सौरभ ची. आमची शक्ती आता नि:संशय वाढली होती. आमच्या चौकोनी कुटुंबाचा विस्तार षट्कोनी कुटुंबात झाला होता. चमकू नका असे..... अण्णांची लाडकी धनंजय आणि चंद्रकांत ही दोन मुलं मी नि नीलिमाने दत्तक घेतली. अशी आमची झाली चार मुलं...
काही कारणाने दूर गेलेल्या एकेका लेखकाला, चित्रकाराला पुन्हा नव्याने भेटलो. मधल्या काळाच्या भिंती जणू पुसून गेल्यासारखं सार्यां नीच उत्तम प्रतिसाद दिला आणि धनंजय, चंद्रकांत वरील प्रेमामुळे आमचा श्रीगणेशा चांगला झाला.......

4 comments:

  1. kharach tumchya choughanchya (tumhi dogha ani tumchi mula) kashtanech dhananjay aaj itaka yashasvi ank aahe!!! great!!!

    ReplyDelete
  2. Yes, it is certainly commendable how you two shouldered the responsibility that comes with a great legacy like "Dhananjay" and "Chandrakant". If it lightens your burden, do remember that it is not only you who has 50-years relation with these publications: nay, more importantly, your readers share the legacy too, and they too have continuous 50-years relation of affection. I, for one, have been reading and collecting for my personal library all the issues of Dhananjay and Chandrakant since I was old enough to ask for money to my dad!
    All the best compliments on the Golden Jubilee year of Dhananjay. May God bless the family.

    Ravindra Bhaiwal

    ReplyDelete
  3. नमस्कार रविंद्रजी,

    धनंजय आणि चंद्रकांतची वाटचाल ही नक्कीच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आमच्यासह वाचकांचीही तितकीच आहे. त्यांच्याच प्रोत्साहनपर पाठिंब्याच्या जोरावर आज हा सुवर्णमहोत्सवी टप्पा आम्हाला गाठता आलेला आहे. अंकाशी संबंधित मंडळी आणि सुजाण,चाणाक्ष रसिक वाचकांच्या, शुभचिंतकांच्या दिवसेंदिवस लाभलेल्या उत्तम प्रतिसादानेच आज हा नव्या माध्यमाद्वारे संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि तुमच्यासारखे अभ्यासू, संग्रहप्रेमी वाचक इथे आम्हाला आपल्या जुन्या ऋणानुबंधांची याद करून देतात, यातच आम्ही योग्य दिशेने वाटचाल करीत असल्याचा हा निर्वाळा आहे. तुमच्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद.

    ReplyDelete