यंदा धनंजय दिवाळी अंकाचं सुवर्णमहोत्सवी वर्ष. त्यानिमित्ताने अनेक वर्षांचा स्नेह असलेल्या राजेंद्र प्रकाशनाच्या श्री. राजेंद्र शंकरराव कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी नीलिमा कुलकर्णी यांची त्या अंकाबद्दलची, प्रकाशनव्यवसायाबद्दलची ५० वर्षे अव्याहत सुरू असलेली अखंड साधना आता या ब्लॉगच्या रूपात - अनुराधा परब
Thursday, July 29, 2010
सजग संपादक
कथा आवडली अगर अंकही आवडला तर आमचे रसिक वाचकमित्र पत्राद्वारे ते आवर्जून कळवतात. आणि खरं सांगू का, तर हिच पत्रं, त्यांचे फोन हे आमच्या कार्याला प्रोत्साहन आणि प्रेरणा देत असतात. याच शुभचिंतकांच्या, सुहृदांच्या बळावर तर पुढील अंक अधिक चांगला काढण्याची जबाबदारी आणि उमेदही आम्हाला मिळत असते....
असो. सातआठ वर्षांपू्र्वी धनंजयच्या दिवाळी अंकात डॉ. बाळ फोंडके यांची एक कथा प्रसिद्ध झाली होती. कारखान्यातील सुरक्षाव्यवस्थेतील ढिलाई आणि दुर्लक्षामुळे तेथील एका कामगाराच्या शरीरात आर्सेनिक भिनल्याने त्याचा मृत्यू ओढवतो, असं ते कथानक होतं. फोंडके यांची ही कथा वाचून गोदरेज कंपनीतील सिक्युरिटी डिपार्टमेंटमधील इंजिनिअर श्री. अशोक कुलकर्णी यांचा कथा आवडली, हे सांगण्यासाठी फोन आला. जवळजवळ १५ -२० मिनिटं ते बोलत होते. त्यांच्या पारशी साहेबाला ही कथा ते इंग्रजीत भाषांतरीत करून वाचायला देणार होते. संपादकाची पत्नी या नात्याने त्यांचा हा मनसुबा ऐकून नक्कीच आनंद झाला होता. माझे पती राजेंद्र त्यावेळेस रहेजा कन्स्ट्रक्शनमधे आर्किटेक्ट म्हणून नोकरी करायचे. त्यामुळे ते संध्याकाळी घरी आले तेव्हा त्यांना हा सारा किस्सा मी अगदी जसाच्यातसा सांगितला. त्यांच्या स्मरणात ते राहणं ओघाने आलंच. अंकातले विषय हे कसे, कधी आणि कुणाला अपील होतील हे काहीच सांगता येत नाही. आणि साहित्य म्हणजे तरी काय हो, आपल्या भोवताली घडणार्याी गोष्टी – घटना प्रसंगांमधेच तर त्याची बिजं लपलेली असतात. म्हणून तर ते विषय, त्या कथा- कादंबर्याट- कविता ‘आपल्याशा’ वाटतात.
दिवाळी अंक बाजारात आला की ८-१० दिवसांनी राजेंद्र यांची विक्रेत्यांकडे विक्रीबद्दलच्या उत्सुकतेपोटी एक फेरी तरी किमान असतेच. त्याचाच एक भाग म्हणून ते दादरच्या आयडियल बुक डेपोमधे गेले असताना मंदार नेरूरकरांशी बोलत होते. आयडियलच्या मागे असलेल्या त्रिवेणीच्या आवारात सर्व दिवाळी अंक हारीने मांडून ठेवलेले होते. खूप गर्दीही होती. त्याच गर्दीत एक व्यक्ती अंक आणि पुस्तकांचं बिल बनवून घेत होती. त्यांनी आपलं नाव नोंदवण्यासाठी सांगताच राजेंद्र कुळकर्णींचे कान टवकारले गेले नसते तरच नवल होतं. क्षणात ते वळले आणि त्यांनी त्या व्यक्तीच्या खांद्यावर ओळखीची थाप मारत विचारलं, “आपण गोदरेज मधले अशोक कुलकर्णी? मी धनंजयचा राजेंद्र कुळकर्णी!” ह्यांच्या अशा अनपेक्षित आपुलकीयुक्त वागण्याने ते अवाक् झालेले. रहस्यकथा मासिकाच्या संपादकाला हे सगळे बारीकसारीक तपशील लक्षात नसतील, असं कसं. काही वेळाने अशोकजींनी ह्यांना त्यांच्या घरी कॉफी प्यायला नेलं आणि ही मैत्री दृढ झाली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment