संपादकाची पत्नी काय? .....चांगलीच जिरली.
नमस्कार, मी नीलिमा राजेंद्र कुळकर्णी.... आठवणींच्या गावात गेलं की काय सांगू आणि कसं सांगू?, असाच प्रश्न पडतो. आमचं लग्न ठरलं तेव्हा असं कळलं होतं की, राजेंद्र कुळकर्णी हे धनंजय चे संपादक आहेत. एक आर्किटेक्ट आणि लॉ केलेली व्यक्ती संपादकही आहे, हे ऐकून छानच वाटलं होतं. तोवर संपादकाच्या चिंता, अडचणी, व्याप या सगळ्याशी परीचित व्हायचे होते. माहेरी असतेवेळी पुस्तकं, अंक वाचण्याखेरीज संपादक वा प्रकाशक या नावाशी ना व्यवसायाशी माझा कधी संबंध आला होता. त्यामुळे मगाशी म्हटलं तसं त्यामागचं इंगित कळण्याचा काही सवालच नव्हता.
१९८६मधे ह्यांनी धनंजयची सूत्रं आपल्या हाती परत घेतली तेव्हा सणवार नाही, सुट्टी नाही, दिवस म्हणू नका रात्र म्हणू नका...हे आपले सतत त्याच विषयात आणि त्याच कामात गढून गेलेले. अशाने मी अतिशय कंटाळायचे. पण नंतर कसं कोण जाणे मीही त्याच कामाचा एक भाग बनून गेले. अंदाजाने प्रूफ करेक्शन आणि दिवसभर ऑफिस सांभाळणे, पार्सलिंग, पोस्ट, ट्रान्सपोर्ट ह्या सर्व वेळखाऊ कामाच्या जबाबदार्यार मी घेतल्या. कारण दिवसा ह्यांची नोकरी असे.
असेच पावसाळ्याचे दिवस होते..महिन्याचा अंक तेव्हा सुरू होता. अन् मुलांना शाळेला सुट्टी होती. ती तेव्हा असतील ४-५ वर्षांची. पोस्टाचे कन्सेशन घेतलेले असेल तर त्याच तारखेला अंक पोस्ट करावा लागतो, म्हणून मी थेट प्रेसमधे गेले. अंक बाईंड करून टॅक्सीत घातले आणि पोस्ट ऑफिसपाशी आले. मुलांना फुटपाथवर उभं करून अंक टॅक्सीच्या डिकीतून काढून फुटपाथवर ठेवत होते. अन् तेवढ्यात एका बंडलाची दोरीच तुटली, अंक रस्ताभर विखुरले.. मदतीला कुणीच नाही. कुणा हमालाला बोलवावं तर मुलांजवळ कोण रहाणार?.. हा सारा गोंधळ कमी होता म्हणून की काय पावसाने त्यात आपलीही भर घातली. ... ह्या सगळ्या प्रकाराने माझ्याही डोळ्यात पाऊस दाटलेला... नशिबाला दोष देत, ह्यांच्यावर वैतागत माझी मीच त्या भरल्या पावसात कामाला लागले. संपादकाची पत्नी काय असतं, ते तेव्हा कळलं....
पार्सल ऑफिस आणि मी
कामाची पुरेशी ओळख नसताना कशी एकेक भंबेरी उडते, ते आज आठवून हसायला येतं. पण तेव्हा मात्र नको जीव व्हायचा. अशीच एक गोष्ट पार्सल ऑफिसची. रेल्वे पार्सलचं काम ९८६ -८७ पासून मीच करत होते. महिन्यातून एकदाच भरपूर काम असल्याने चांगला पगार देऊन मदतनीस ठेवणं तेव्हा परवडणारं नव्हतं आणि कमी पगारावर कुणी मिळायचंही नाही. तेव्हाचं व्हि.टी. स्टेशन आताचं सी.एस.टी. बाहेरगावी जाणार्यां गाड्यांच्या फलाटालाच लागून तेव्हा गोडाउन कम पार्सल ऑफिस होतं. पूर्णपणे पुरूषांचीच मक्तेदारी असलेल्या त्या ऑफिसमधे हमाल येऊन पार्सलं काट्यापाशी नेऊन धाडदिशी टाकून निघून जायचे. मग एकेका पार्टीचं पार्सल उचलून काट्यावर टाकायचं, ते बाजूला करून दुसरं टाकायचं. मी नवखी, त्यात कुणाशीही ओळख नाही, त्यामुळे सुरवाती सुरवातीला माझी होणारी तारांबळ बघत सारे उभे असायचे. नंतर पुढे माझं जाणं नेहमीचं झाल्याने तेथील हफीजभाईंशी आणि नंतर नामजोशींशी ओळख झाली आणि काम काहीसं सुकर झालं.
आणि आता तर पार्सल ऑफिसही सुधारलं आहे आणि माझ्या ओळखीही वाढल्या आहेत.
No comments:
Post a Comment