Thursday, August 26, 2010

प्रभाकर पेंढारकर – नम्र माणूस


सुप्रसिद्ध लेखक, कथा-कादंबरीकार, पटकथा –संवादलेखक, दिग्दर्शक अशा अनेक भूमिका लीलया पेलणार्‍या आदरणीय प्रभाकर पेंढारकरांशी माझी कशी ओळख झाली आणि धनंजय – चंद्रकांतमधून त्यांनी केलेल्या लेखनामुळे वेगळ्या वाचकवर्गात ह्या अंकांचा आलेख कसकसा चढत गेला, याची जन्मकथा मोठी रोचक आहे.
                  साधारणपणे ११-१२ वर्षांपूर्वी मला माझा जेजेतील मित्र सतीश कोळवणकरच्या बायकोचा- शीतलचा फोन आला. अंजू, रारंगढांग  वाचलंयस? मी प्रामाणिकपणे  नाही असं कबूल केलं. माझं वाचन तसं कमीच. वाच एकदा!” सांगून ती त्या कादंबरीच्या   कौतुकात रंगूनच गेली. अर्थात हे कौतुक पेंढारकरांचं होतं. तिचं सांगणं मनावर घेतच जणू मी लगेचच पुस्तक विकत आणून वाचायला सुरवात केली. झपाटल्यागत वाचून काढलं आणि ठरवलं, बस्सं, हे लेखक आपल्याकडे हवेतच. त्यासाठी नेटाने प्रयत्न करायचा. आणि हो, माझा अनुभव आहे, की मनापासून प्रयत्न केलेत तर काही काळाने का होईना, ते फळास येतात. पेंढारकरांना फोन केला. त्यावेळी ते वांद्र्याच्या साहित्यसहवास मधे रहायचे. अलिकडे पुण्यात शिफ्ट झालेत. अतिशय मृदूभाषी, हळूवार आणि प्रेमळवृत्तीचा माणूस ! इतकं की, त्यांचं केवळ बोलणं जरी ऐकलं तरीही मन प्रसन्न व्हावं. लहान मोठं अशा सार्‍यांशीच त्यांचं आदराने, आपुलकीने वागणं नकळतपणे आपलंसं करून टाकतं. फोनवरून त्यांची वेळ घेतली आणि काही दिवसांनी त्यांच्या घरी गेलो. पेंढारकर उभयतांनी उत्तम पाहुणचार केला.
                   या भेटीमध्ये त्यांनी मला त्यांचं एक पुस्तक दिलं. बोलता बोलता मी त्यांना धनंजय – चंद्रकांतला आपलं साहित्य हवं आहे, अशी विनंती करत त्यांच्या हाती दोन्ही अंक दिले. अंकांचं स्वरूप काय असतं, त्यांचे विषय, स्वभाव याबद्दल सांगितलं. बघतो, म्हणाले. त्या शब्दांमधली सुप्त आश्वासकता घेत खुशीत परतलो. त्यांच्या या सकारात्मक प्रतिसादाने अर्धी लढाई जिंकल्याचा एकूण आविर्भाव माझ्यात संचारला होता. वरचेवर फोन करत होतो, दरवर्षी अंक देत होतो. त्यांच्या शब्दांनी मनात जागवलेली आस तगवून ठेवली होती. अनमोल काही हवं तर त्यासाठी कमालीचा संयम, धीर तर हवाच. पेंढारकरसाहेब नाही म्हणाले नाहीत, यातच सारंकाही आलं.
                २००५ सालची दिवाळी धनंजय आणि चंद्रकांतसाठी, त्यांच्या वाचकांसाठी आनंदाची ठरली. दोन्ही अंकांकरिता पेंढारकरांनी अप्रतिम लेख दिले. ते गाजलेही. आणि त्यांच्या लेखनसहभागाने हे अंक वेगळ्या साहित्य वर्तुळात गेले. नामांकितांचे असे जे वर्तुळ आपल्याकडे म्हटले जाते, त्यात शिरकाव करायचा अगर त्यांना आपल्यापर्यंत आणायचं, यात अंकांनी बाजी मारली. तोवर या अंकांकडे काहीसं दुर्लक्ष करणार्‍यांनाही आपली दखल घेणं भाग पडलं. यावर्षीच्या अंकांची चर्चा झाली.
                गेली २५ वर्षे नित्यनेमाने मी मा. प्रा. डॉ. विजया राजाध्यक्ष यांना अंक पाठवत आहे. निदान त्यांनी ते अंक चाळावेत, ही त्यामागील मनोधारणा!  त्या वर्षी मॅडमनी दोन्ही अंकांतील प्रभाकर पेंढारकरांचे लेख वाचले आणि त्यांनी थेट फोन लावला तो श्री. पु. भागवतांना!  मौजच्या  दिवाळी अंकात पेंढारकर का नाहीत? ते मौजेत हवेत.  दिवाळी २००५ पर्यंत मौज दिवाळी अंकात पेंढारकर लिहीत नसत किंवा मौजही त्यांच्याकडून साहित्य मागवतही नसे. मात्र २००६ पासून श्री.पुं.नी फोन केला आणि पेंढारकर मौजेच्या दिवाळी अंकात नियमित लिहू लागले. हा सारा प्रसंग पेंढारकरसाहेबांनीच मला सांगितला. वास्तविक पाहता रारंगढांग, अरे संसार संसार ह्या त्यांच्या कादंबर्‍या मौजेनेच प्रकाशित केल्या असल्याने ते मौजेचे लेखक होते. तरीही मौजेच्या दिवाळी अंकात त्यांनी तोवर कधीच लिहीलं नसल्याने ती संधी आपल्या अंकांमुळे मिळाल्याचं सांगताना त्यांच्या स्वभावातली ऋजूता स्पर्शून गेली. अतिशय आनंदित स्वरांत ते असं काही रंगवून सांगत होते की, हे जे काही घडलं ते खरोखरंच आपल्याचमुळे याबद्दल समोरच्याला खात्रीच पटावी. आम्ही निमित्तमात्र होतो. त्यांच्या लेखनामुळे एलिट क्लासमधेही हे अंक पोचल्याचं एक असीम समाधान मिळालं होतं  
                पेंढारकरांचा प्रत्येक लेख हा तोलून मापून, घडीव शब्दांचा असतो. असे लेख अंकांसाठी लाभणं हिच अभिमानाची बाब असते आणि त्यानंतर त्यांचे  एका स्टुडिओचे आत्मवृत्त प्रकाशित करण्याची जबाबदारी राजेंद्र प्रकाशनावर सोपवली तेव्हाचा आनंद तर विलक्षण होता.
त्याविषयी ओघाने येईलच पुढे.. .......  

Wednesday, August 25, 2010

निवडक धनंजयच्या निमित्ताने....


परवा प्रकाशित होणार्‍या निवडक धनंजय – तृतीय नेत्र या स्मृतिग्रंथामधे तीन महनीय व्यक्तींचा सहभाग आहे. सुप्रसिद्ध लेखक यशवंत रांजणकर, रमेश के. सहस्त्रबुद्धे आणि धनंजयच्या मुखपृष्ठापासून ते आतील सजावटीचे सर्वेसर्वा चित्रकार र. स. कंटक. या तिघांनी आणि अर्थातच सर्वांनीही धनंजयवर, ती. अण्णांवर निस्पृह प्रेम केलं. अण्णांच्या कामातील आत्मियता, एकाग्रता, विषयाचा वेध घेण्याची वृत्ती, प्रत्येकाशी ममत्वाने –प्रेमाने बोलण्याची अंगभूत सवय.... किती गुण एकाच व्यक्तीच्या ठिकाणी असावेत?
या तीनही महनीय व्यक्तिंशी माझा नेहमीच संवाद असतो. दरखेपेस भरभरून बोलणं, जुन्या आठवणी जागवणं हे घडतच असतं. खरं तर तो त्यांच्या करीअरच्या सुरूवातीचा, उमेदीचा काळ. त्यांच्या बोलण्यातून अक्षरश जोमाने काम करण्याचं ट़ॉनिकच मिळत असतं.
ती. अण्णांनी यशवंत रांजणकरांचा पहिला कथासंग्रह आराधना प्रकाशित केला होता. त्याचे मुखपृष्ठ कंटकांचं होतं. छोटेखानी समारंभात ह्या पुस्तकाचं प्रकाशन प्रा. वि.ह.कुलकर्णी यांच्या हस्ते झालं होतं. तेव्हा ताज्या दमाचे लेखक असलेले रांजणकर आठवणी जागवताना आजही सांगतात की, त्यांना लेखक म्हणून पहिले मानधन अण्णांनी आणि बा.द. सातोस्कर (संपादक, प्रकाशक – दै. गोमंतक, गोवा) यांच्याकडून मिळालं होतं.
र. स. कंटकांनी तर धनंजय आणि चंद्रकांतचा कलाविभाग केवळ एकहाती सांभाळला एवढंच नव्हे तर अप्रतिम रेखाचित्रं, मुखपृष्ठाकरिता केलेले विविध प्रयोग आजही तितकेच ताजे आहेत. अण्णांनी त्यांच्यातली गुणवत्ता, प्रतिभा हेरूनच त्यांच्या सृजनशीलतेला पूर्ण मुभा दिलेली होती. धनंजयची शीर्षकं, सुलेखन , कथांची शीर्षकं यांतले वैविध्य तर थक्क करणारेच! कंटकांचे रिअॅलिस्टिक, कोलाज, ग्राफिक्स तर अप्रतिम होतेच शिवाय पेंटींग(वॉटर कलर), सिंगल कलर(ब्लॅक अॅण्ड व्हाइट), तर कधी फक्त २-३ रंगात(लाल, पिवळा, निळा)च चार रंगांचा इफेक्ट आणणं....यातलं पोटातलं गुपित असं की, त्यामुळे चौथ्या काळ्या रंगाचा खर्च वाचतो.... हे प्रकाशकाची काळजी घेत केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगेच!
अंकाला लेखकांचं साहित्य जसं उठाव आणतं त्याचप्रमाणे त्याला अनुलक्षून असलेली चित्रं, शीर्षकं, मुखपृष्ठ, अनुक्रमणिका, कथाचित्रं अशांचाही परिणाम फार मोठा असतो. ह्या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक ठरल्यास वाचनाचा आनंद, समाधान अनेक पटींनी वाढतं.
या बरोबरच अंक हाती पडला की संपूर्ण कथा, कादंबरी काही लगेच एका नजरेत वाचून होत नाही. अशा वेळी वाचकाचं पहिलं लक्ष जातं ते पानपूरके आणि चौकटींकडे. अतिशय थोडक्यात, अल्प शब्दांत माहितीपूर्ण चौकटी देण्याची प्रथा धनंजयने सुरू केली. यात अगदी पहिल्या अंकापासून रमेश के. सहस्त्रबुद्धे यांचा त्याकरिता सहभाग लाभला. धनंजयला रहस्यकथांचा बादशहा अशी उपाधी मिळाली आहे तशी चौकटींचा बादशहा अशी सहस्त्रबुद्धे यांना मिळायला हरकत नाही. सहस्त्रबुद्धे आणि माझी ओळख व्हायला एक इव्हेंट कारण ठरला. सहस्त्रबुद्धेंच्या करीअरची सुरवातच चित्रपट माध्यमातून झालेली. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्युटमधे त्यांनी फिल्म अॅप्रिसिएशनचा कोर्स केला आणि तिथेच काही वर्षे कामही केलं. १९६८च्या सुमारास नॉव्हेल्टी थिएटरमधे फिल्म इन्स्टिट्युटचे गॅदरिंग होतं. त्याचा पास त्यांनी अण्णांना दिला. माझं सिनेमावेड अण्णांना ठाऊक असल्याने त्यांनी तो पास मला दिला. असरानी, शत्रूघ्न सिन्हा वगैरे संस्थेतली सिनिअर मंडळी तिथे हजर होती. जया भादुरी बहुतेक शेवटच्या वर्षाला होती. याशिवाय त्यावेळचे उगवते तारे, आजचे आघाडीचे कलाकार सहजगत्या आसपास वावरत होते. सहस्त्रबुद्धेंच्या परिचयातून आणि नंतर दृढ होत गेलेल्या नात्यातून अशा अनेक आठवणींचे कोश उलगडत राहतात. आमची वाटचाल इथवर झाली, हे सांगूनही विश्वसनीय वाटत नाही इतका ताजेपणा त्यात आजही टिकून आहे.    

Tuesday, August 24, 2010

‘तृतीय नेत्र’ – केव्हा, कुठे वाचाल !!


तृतीय नेत्र  उलगडत असताना पन्नास-साठ दैदिप्यमान ज्वलज्जहाल भडका आपल्या अंगावर येऊन धडकणार आहे. त्यात एकाहून एक मान्यवर लेखकांचे अग्निबाण, रायफली आणि अदृश्य चेटकिणी यांचा एकच मारा होणार आहे!
तृतीय नेत्र हे पुस्तक लोकल प्रवासात किंवा निवांत दुपारी वाचण्याचे नाही. घरात कुणी नसताना, अपरात्री मंद मेणबत्तीच्या उजेडात वाचावयाचे पुस्तक आहे. बाहेर निसूर शांतता असेल. त्यात कडकडणारी वीज वाजावी किंवा बागेतल्या झाडाची अनिवार सळसळ व्हावी, अशा वेळी वाचावे.कुठेतरी अनवट फडफड – अशा वेळी वाचावे. टॉयलेटचा दिवा लावण्यासाठी स्वीचवर हात नेताना कुणी अक्राळ हसत स्वीचवरील आपले मनगट पकडले तर ? बंद टॉयलेटमधला दिवा आधीच लावून ठेवा मग दार बंद करा. घराच्या ओसरीतही जाऊ नका. विहीरीकडले दार नीट बंद करा.
वाड्यात राहात असाल तर वरच्या मजल्यावर जाऊन रात्री एकट्याने वाचा.
       महानगरात राहात असाल तर मध्यरात्री एकांतात वाचा.
मध्यम शहरात राहात असाल तर म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली बसून एकट्याने वाचा.
दहा फुटावरले धपापते कुत्रे तुम्हांला न्याहाळत असताना वाचा.
घरात वाचत असताना खिडकी बंद करू नका.
      खिडकी बंद केली तर टकटक नक्की होणार!!
पडदे उघडे ठेवले तर अंधारातून कोणीतरी पाहात असेल.
बंद केलेत तर पडद्यावर सावली येईल.
भुताची गोष्ट असो नाहीतर रहस्यकथा; तिची खुमारी अपरात्रीच्या अपुर्‍या
     उजेडातल्या एकटेपणातच वाढणार!! अंगावर सरसरून येणारा काटा आणि
     कानाची हाडे तटाक्कन उभी राहाणे, याशिवाय झटितिप्रत्यय तो कोणता??
     - हे केले नाही, तर काही मजा नाही!!
एकदा हे पुस्तक, मी म्हणतो, तसे वाचून पहा!!
                                  प्रो. डॉ. शिरीष गो. देशपांडे

सादर निमंत्रण.....


        दर्जेदार रहस्यकथांचा बादशहा म्हणून प्रसिद्ध पावलेल्या धनंजय मासिकाचे १९९० सालापासून वार्षिकात रूपांतर झाले. धनंजय प्रसिद्ध होण्याचा काळही नुसताच बदलला असे नव्हे तर त्याचे अंतरंगही बदलले. ते इतके की, इंग्रजीत निघणारे रिडर डायजेस्ट आपण मराठी अनुभवतो आहोत की काय, असे त्याचे प्रत्यंतर यावे. धनंजयच्या प्रांगणात आता खून आणि मारामारीच्या, गुन्हेगारीच्या, साहसांच्या कथांनीही आपला बाज बदलल्याचं दिसून येईल. त्याचजोडीने विज्ञानकथा, भूतकथा, अद्भूत कथा, अद्भूत सत्यकथा, भय कथा, गूढ कथा, आघात कथा, संशोधन कथा, वैद्यकीय गुन्हेगारी स्वरूपाच्या कथा अशा अनेक अंगांनी धनंजयचा अंक वाचनीय करण्यावर भर राहिला आहे. म्हणूनच वर्षागणिक धनंजयचा वाचकवर्ग वाढतो आहे, त्याचं प्रमाणही एवढं की, मागणी आल्यावर प्रती संपल्या असे नाईलाजाने उत्तर द्यावं लागतं, तेही दरसाली जास्त प्रती छापून ही वेळ येतेच. वाचकांच्या अलोट प्रेमामुळे आणि त्यांच्या आमच्यातील फोन, पत्ररूपी संवादाने आजवरची वाटचाल ही सुकर झाली, यात काहीच वाद नाही. त्याच जोरावर धनंजय यावर्षी पन्नासाव्या (५०) वर्षात पदार्पण करीत आहे. एकशे दोन वर्षांच्या दिवाळी अंकांच्या इतिहासात धनंजयचा पन्नास वर्षांचा भरीव सहभाग ही नक्कीच दुर्लक्षिता येणारी बाबच नाही.
        याच सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने राजेंद्र प्रकाशन आणि न.चिं. केळकर ग्रंथालय, मुलुंड यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवार, दि. २८ ऑगस्ट रोजी धनंजयची गेल्या ५० वर्षांतील प्रगती, त्यातील महत्त्वाचे टप्पे दर्शविणार्‍या कथांचा धांडोळा निवडक धनंजय – तृतीय नेत्र या स्मृतिग्रंथाच्या रूपाने घेतला जाणार आहे. या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र सेवा संघ, अपना बाझारच्या वर, जवाहरलाल नेहरू मार्ग, मुलुंड (प) येथे सायं ४.३० वा. होत आहे. या सोहळ्याला नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर, अनुराधा वैद्य, प्रो. डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे, रहस्यकथाकार यशवंत रांजणकर, ज्येष्ठ चित्रकार र. स. कंटक, रमेश के. सहस्त्रबुद्धे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आपणा सर्वांना या कार्यक्रमासाठी आग्रहाचं निमंत्रण.
                                                        आपला......
                                                       राजेंद्र शंकरराव कुलकर्णी

Friday, August 20, 2010

प्रतिमा उत्कट


         आजच्यासारखी टीव्ही चॅनेल्सची रेलचेल किंवा मनोरंजनाची विविध माध्यमं त्याकाळी सर्रास उपलब्ध नव्हती. वाचन हाच काय तो विरंगुळा आणि अभ्यासाचाही भाग असे. वाचनाने कित्येकजण भारावल्याची उदाहरणेही भोवताली आपण ऐकतो, तेव्हा मला माझीही अशीच एक आठवण इथे सांगाविशी वाटते. मी ७वी-८वीत असतानाचा काळ.  आमच्या दुकानात चार आणे माला असत. वेळ मिळेल तेव्हा हातात पुस्तक असे माझ्या. बाबुराव अर्नाळकरांचे महंताचे भूत पुस्तक वाचत रात्री २ वाजेपर्यंत भूतासारखीच जागले होते. त्यांच्या त्या झुंजार विजयाने एवढं वेड लावलं होतं की मरीन लाइन्सला झुंजार महाल कुठे आहे, तो शोधायचाही मी प्रयत्न केला. आता सांगितलं तर हसाल तुम्ही. माहीम स्टेशनजवळ झुंजारचे तळघरातले घर शोधले. एवढंच कशाला, मुंबई पुणे रस्त्यावर चौक गाव लागलं तेव्हाचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता. गांवदेवीला धनंजयांचे ऑफिस कुठे तेही शोधलं. इतकं झपाटल्यागत झालं होतं की मनातल्या मनात त्याचा सिनेमा काढायचाही निश्चित केलं होतं. आणि सीआयडी चित्रपट पाहिल्यापासून तर झुंजार विजयाकरता देवआनंद आणि शकीला ही स्टारकास्टही फिक्स केली होती.  पण ते मनातले मांडे मनातच राहिले.
        खूप वर्षांनंतर आमच्या दुकानात खरेखुरे डिटेक्टिव्ह आले असताना अण्णांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. ते गेल्यावर मी अण्णांना म्हटलंही, हे तर अजिबात धनंजयसारखे दिसत नाहीत. ते खरंच डिटेक्टिव्ह आहेत ना?... लेखकाने लिहिलेल्या गोष्टी, निर्माण केलेली पात्रं ही आपण प्रत्यक्ष जीवनात शोधायला लागतो. कधी ती गवसल्यासारखी वाटतात तर कधी चांगलीच फसगत होते आपली.
नायक
         अक्षर साहित्य ही अण्णांच्या कल्पक योजनांपैकी एक योजना. या माध्यमातून त्यांनी प्रसिद्ध लेखकांची पुस्तके अल्प किंमतीत काढली आणि विकली. त्यावेळचे लोकप्रिय आणि तरूणतरूणींचे लाडके लेखक म्हणजे ना. सी. फडके यांच्या काही कादंबर्‍या अण्णांनी केवळ ३ रूपये किंमतीला काढल्या. फडके त्यावेळी एका छापील पानाकरता ३० रूपये घेत असत. वाचनसंस्कृतीसाठी अण्णांनी असेही तुटीचे व्यवहार केले. घर आणि दुकानाचा परिसर एकत्र असल्याने साहजिकच मी दुकानातच घुटमळत होते. अनेकांची ये-जा सुरू होती. तितक्यात अण्णांनी मला हेमाताईला बोलावून आणायला पिटाळलं. हेमाताई म्हणजे हेमलता माईणकर. कलासक्त आणि साहित्यप्रेमी कॉलेजकन्या. अण्णा म्हणाले, हे बघ, कोण आलेत? ना. सी. फडके !”. आपल्या दैवताला साक्षात समोर बघून हेमाताईच्या नजरेत विलक्षण आनंद, अपार आदर दाटून आलेला मी पाहिला. तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. एकाच जागीच थिजल्यासारखी झाली होती ती. थोडी मोठी झाल्यानंतर मीदेखील फडक्यांच्या कादंबर्‍या वाचू लागले आणि चकीतच झाले. त्यांच्या नायकाचा पोषाख,  त्याचे वर्णन दुटांगी पंख्याचे धोतर , पांढरा शर्ट, कोट, रूबाबदार - हुबेहूब लेखकच. त्यावेळी माझ्या लक्षात आली हेमाताईची अशी अवस्था का झाली होती ते. आणि मलाही त्यावेळी हेमाताईच झाल्यासारखं वाटलं.  
                                                     सई शरच्चंद्र नाईकसाटम
                                                    (चारूशीला शंकरराव कुलकर्णी)       

Wednesday, August 4, 2010

धनंजयच्या वाचकांची निवडक पत्रं.... भानू काळे

सप्रेम नमस्कार विनंती विशेष.....

धनंजय आणि चंद्रकांत दिवाळी अंक प्रसिद्ध करण्याआधीपासूनची धांदल काय आणि कशी असते, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. लेखक, त्यांच्या कथा – कादंबर्याे घेताना, त्यांच्याशी भावबंध कायम राखताना, जाहिरातदार मिळवताना, आलेला मजकूर टाईप करण्यासाठी पाठवताना, त्याची प्रुफं एकत्रित करताना ते अगदी प्रत्यक्ष अंक दिवाळीच्या आधी बाजारात कसा येईल, यासाठी दिवसरात्र एक करताना मित्रहो, साथ असते ती तुमच्या शब्दांची! वेळोवेळी तुम्ही केलेल्या सूचनांची, कौतुकाची, आवर्जून दिलेल्या पोचपावतीची! तुमचे शब्द, त्यातल्या प्रत्यक्षाप्रत्यक्ष भावना आमचा हौसला वाढवतात आणि जबाबदारीचं भानही. मागील अंकापेक्षा यंदाचा अंक अधिक चांगला निघावा, यासाठी आमच्या प्रयत्नांमागे असते ती तुमची बोलकी तर कधी नि:शब्द साथ! त्याच्याच बळावर हे अवघड शिवधनुष्य पेलण्याचं बळ आम्हाला येतं. खरं सांगतो मंडळी, माझे वडील श्री. शंकरराव कुळकर्णी हे अंक काढत असताना काय अग्निदिव्यातून जात असतील, याची प्रचिती हा अंक अनेकांच्या शुभेच्छांच्या बळावर आणि अण्णांच्या पूर्वपुण्याईवर आम्ही चालवायला घेतला तेव्हा लक्षात आलं. शेवटी अण्णांची जिद्द, संयमीपणा, लोकसंग्रहाची वृत्ती आणि उत्तम तेच देण्याचा आग्रह आम्हीही कायम ठेवत इथवरची मजल गाठली आहे. हे मन्मनीचं सांगण्याचं कारण म्हणजे मला या ठिकाणी काही वाचकांच्या पत्रांचा उदाहरणादाखल नक्कीच परिचय तुम्हालाही करून द्यावासा वाटतो. आज अत्याधुनिक तंत्रज्ञानाने जग खूप जवळ येत चाललं आहे. लिखित पत्रांचा जमाना तसा राहिलेला नाही. मात्र, आपल्या महाराष्ट्रात आजही असे काही भाग आहेत की, जिथे ह्या सुविधा अद्यापही पोचलेल्या नाहीत. धनंजय, चंद्रकांत मात्र तिथेही पोचलेत, हे विशेष. अशा ठिकाणांहूनही चोखंदळ वाचकांची आम्हाला आवर्जून पत्र येतात. कथा, कादंबरी आवडल्याची तर कधी मुखपृष्ठ आवडलं असं सांगणारी रसिक पत्रं देखील हुरूप वाढवून जातात. कधी पोस्टकार्ड तर कधी भलीमोठी पत्रं, आंतर्देशीय तर कधी केवळ फोनवर आपली प्रतिक्रिया देणारी अशी नाना तर्हेडची वाचक मंडळी आमच्या या परिवारात सामील होत गेली. आणि हा आमचा गोतावळा आज मागे वळून पाहताना नक्कीच गहिवरून येतं. एका ध्येयाने पछाडल्यागत हे अंक प्रसिद्ध करीत आलो, उत्तमोत्तम लेखकांची, चित्रकारांची तेवढीच तोलामोलाची साथ आम्हाला लाभली. हे सारं येत्या २८ ऑगस्ट रोजी “निवडक धनंजय”च्या निमित्ताने पुन्हा एकवार समोर साक्षात होईल आणि पुढच्या वाटचालीकरता ते नक्कीच आपणां सर्वांसाठी प्रेरक ठरेल, हिच सदिच्छा...
आपला नम्र, राजेंद्र शंकरराव कुळकर्णी.