Friday, July 30, 2010

सोळावं वरीसं अलकाचं.......

मराठीतील एक श्रेष्ठ मनस्वी, कलंदर कवी श्रीकृष्ण पोवळे हे अलका मासिक काढत असत. अलका मासिकाला वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत होता. तत्कालिन मासिकांपेक्षा वेगळ्या धाटणीचे म्हणून त्याच्या वाचक संख्येमधेही लक्षणीय बदल होत होते. मासिक आणि विशेषांकाच्या विक्रीची व्यवस्था अण्णांकडे असे. मासिकाच्या मांडणीतूनही संपादक आणि त्यांचे सहकारी सातत्याने वेगळेपण राखण्याचा प्रयत्न करीत असत. अशा या अंकाची वाटचाल तब्बल एक दोन नव्हे तर सोळा वर्षांची होत आल्यानंतर तर अंकाचं काम करणार्यांाच्या ठायी कमालीचा उत्साह संचारला होता. हे वर्ष १९५७-५८ असावं. अलकाचं हे सोळावं वर्ष संस्मरणीय व्हावं, अंकाला काही नवा साज देता आला तर पहावं, याचा विचार दिवसरात्र डोक्यात घोळत होता. ..... नवथर वयाचा हा टप्पा साधारणपणे मानवी आयुष्यात कशातर्हे ने स्वीकारला जातो अथवा साजरा केला जातो, हे तर प्रत्येकाच्या प्रकृतीवर अवलंबून असतं म्हणा.. तरीही तो एक आनंददायी काळ असतो, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. बालपणाचे फुलपंखी दिवस संपून आपल्याला आपली ओळख होण्याचा, नवनवीन क्षितिजांनी – मोहांनी खुणावण्याचा तो मोरपंखी मोहमयी काळ असतो. आपण मोठे झालो आहोत, ही मानसिक आणि शारीरिक अवस्थादेखील हुळहुळणारी असते. अलकाच्याही बाबतीत तसंच होतं. फक्त फरक इतकाच की, ते एक मासिक होतं. त्याच्या भावना सोळाव्या वर्षात काय असतील हे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, पण तरीही हा योग असा हातचा दवडायचा तर मुळीच नव्हता. झालं...श्रीकृष्ण पोवळेंनी अण्णांना विचारलं, “अण्णा, आपली अलका आता सोळा वर्षांची झाली. काय विशेष करायचं?” अण्णांच्या विचारांना चालना मिळाली आणि एक मस्तपैकी शक्कल लढवली गेली....नवयौवनाच्या उंबरठ्यावरील अलका. हे तारूण्याचे धुंद, सुगंधी दिवस. दिवाळी जवळ आली तसे घरात अत्तराचे बुदलेच्या बुदले यायला लागले. बुदल्यांचे हे गौडबंगाल आमच्या काही केल्या लक्षात येत नव्हते. अंक तयार झाल्यानंतर त्यावर ह्या बुदल्यांमधील अत्तरांचे फवारेच्या फवारे शिंपडण्यात आले. असा तारूण्याचा बहर ल्यायलेले अलका मासिक सोळाव्या वर्षी प्रकाशित होताना अत्तराच्या सुगंधाने नहातच वाचकांच्या हाती आले. आणि बाहेरगांवी – बाजारात षोडशवर्षीय अलकाचीच चर्चा ऐकू येऊ लागली. अण्णांची ही भन्नाट आयडिया तुफान लोकप्रिय झाली.
आम्हां सर्व मुलांना पोवळ्यांनी नवे कपडे, खूप सारे फटाके घेतले. त्या दिवाळीतल्या नव्या नवलाईचा, अत्तराचा घमघमाट आजही मन मोहरून टाकतो. दिवाळी अंकांच्या इतिहासात अण्णांनी केलेला विलक्षण कल्पक प्रयोग, ना आधी कुणी केला आणि नंतर केल्याचं वाचण्यात आलं.

Thursday, July 29, 2010

सजग संपादक


कथा आवडली अगर अंकही आवडला तर आमचे रसिक वाचकमित्र पत्राद्वारे ते आवर्जून कळवतात. आणि खरं सांगू का, तर हिच पत्रं, त्यांचे फोन हे आमच्या कार्याला प्रोत्साहन आणि प्रेरणा देत असतात. याच शुभचिंतकांच्या, सुहृदांच्या बळावर तर पुढील अंक अधिक चांगला काढण्याची जबाबदारी आणि उमेदही आम्हाला मिळत असते....
असो. सातआठ वर्षांपू्र्वी धनंजयच्या दिवाळी अंकात डॉ. बाळ फोंडके यांची एक कथा प्रसिद्ध झाली होती. कारखान्यातील सुरक्षाव्यवस्थेतील ढिलाई आणि दुर्लक्षामुळे तेथील एका कामगाराच्या शरीरात आर्सेनिक भिनल्याने त्याचा मृत्यू ओढवतो, असं ते कथानक होतं. फोंडके यांची ही कथा वाचून गोदरेज कंपनीतील सिक्युरिटी डिपार्टमेंटमधील इंजिनिअर श्री. अशोक कुलकर्णी यांचा कथा आवडली, हे सांगण्यासाठी फोन आला. जवळजवळ १५ -२० मिनिटं ते बोलत होते. त्यांच्या पारशी साहेबाला ही कथा ते इंग्रजीत भाषांतरीत करून वाचायला देणार होते. संपादकाची पत्नी या नात्याने त्यांचा हा मनसुबा ऐकून नक्कीच आनंद झाला होता. माझे पती राजेंद्र त्यावेळेस रहेजा कन्स्ट्रक्शनमधे आर्किटेक्ट म्हणून नोकरी करायचे. त्यामुळे ते संध्याकाळी घरी आले तेव्हा त्यांना हा सारा किस्सा मी अगदी जसाच्यातसा सांगितला. त्यांच्या स्मरणात ते राहणं ओघाने आलंच. अंकातले विषय हे कसे, कधी आणि कुणाला अपील होतील हे काहीच सांगता येत नाही. आणि साहित्य म्हणजे तरी काय हो, आपल्या भोवताली घडणार्याी गोष्टी – घटना प्रसंगांमधेच तर त्याची बिजं लपलेली असतात. म्हणून तर ते विषय, त्या कथा- कादंबर्याट- कविता ‘आपल्याशा’ वाटतात.
दिवाळी अंक बाजारात आला की ८-१० दिवसांनी राजेंद्र यांची विक्रेत्यांकडे विक्रीबद्दलच्या उत्सुकतेपोटी एक फेरी तरी किमान असतेच. त्याचाच एक भाग म्हणून ते दादरच्या आयडियल बुक डेपोमधे गेले असताना मंदार नेरूरकरांशी बोलत होते. आयडियलच्या मागे असलेल्या त्रिवेणीच्या आवारात सर्व दिवाळी अंक हारीने मांडून ठेवलेले होते. खूप गर्दीही होती. त्याच गर्दीत एक व्यक्ती अंक आणि पुस्तकांचं बिल बनवून घेत होती. त्यांनी आपलं नाव नोंदवण्यासाठी सांगताच राजेंद्र कुळकर्णींचे कान टवकारले गेले नसते तरच नवल होतं. क्षणात ते वळले आणि त्यांनी त्या व्यक्तीच्या खांद्यावर ओळखीची थाप मारत विचारलं, “आपण गोदरेज मधले अशोक कुलकर्णी? मी धनंजयचा राजेंद्र कुळकर्णी!” ह्यांच्या अशा अनपेक्षित आपुलकीयुक्त वागण्याने ते अवाक् झालेले. रहस्यकथा मासिकाच्या संपादकाला हे सगळे बारीकसारीक तपशील लक्षात नसतील, असं कसं. काही वेळाने अशोकजींनी ह्यांना त्यांच्या घरी कॉफी प्यायला नेलं आणि ही मैत्री दृढ झाली.

Wednesday, July 28, 2010

वेगळीच शिक्षा



आम्हां सर्व भावंडांपैकी कोणालाही अण्णांनी कधी चार बोटं लावल्याचं किंवा रागावल्याचं स्मरत नाही. ते अतिशय प्रेमळ होते. गांधीवादी विचारसरणीचा, सानेगुरूजींच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव असल्याने मुलं म्हणजे देवाघरची फुलं ही भावना ठायीठायी भिनलेली. आदरणीय सानेगुरूजींची काही पुस्तके अण्णांनी प्रकाशित केली होती. ते आमच्या घरीदेखील येत असत म्हणे. अण्णा आणि त्यांच्यात झालेला पत्रव्यवहार, करारपत्र लहानपणी पाहिल्याचं आठवतंय. त्यावर मा. मोहन धारियांची स्वाक्षरी असल्याचंही आठवतंय, कदाचित मध्यस्थ किंवा विटनेस म्हणून केली असावी. हे आता काहीच अस्तित्वात नाही. माझं बारसं झालं त्यावेळी ते उपस्थित असल्याचं ऐकलं होतं. त्यांनीच मला मांडीवर घेत राजेंद्र हे नाव ठेवलं होतं. माझ्यानंतरच्या लहान बहिणीचं नावही त्यांनीच सुचवलं होतं – साधना. ती माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान. पण दुर्दैवाने त्यावेळेस सानेगुरूजी नव्हते.
दोन भाऊ आणि तीन बहिणींमधे मीच काय तो मस्तीखोर, बंडखोर होतो. माझा नंबर चौथा असल्याने माझ्या ह्या करामती सगळ्यांच लक्ष माझ्याकडे जावं म्हणूनही असतील. आईच्या हातून खरपूस मार खाल्लाय पण अण्णांचा.......अंहं..! दहा वर्षांचा असतानाचा एक प्रसंग सहज समोर येतोय. दुकानात अण्णा कामात गढून गेले होते. त्यांच्याकडे काही माणसं आली होती आणि अशावेळेस मी त्यांना छळत होतो. बहुतेक मला काहीतरी हवं होतं आणि त्याचा लकडा मी त्यांच्यामागे लावला होता. त्या माणसांशी बोलत बोलत त्यांचं काम सूरू असताना माझी ही भुणभुण ते कानाआड करत होते. दोन-तीन वेळ त्यांनी ऐकून घेतलं आणि शांत नजरेने त्यांनी माझ्याकडे वळून पाहिलं. म्हणाले, “थांब जरा.” ते आता काय करतात त्याची उत्सुकता मलाही लागलीच होती आणि थोडी धास्तीसुद्धा. त्यांनी छोटंसंच एक बालवाङ्मयाचं पुस्तक आणि चाळीस पानी वही, पेन्सिल मला दिली आणि म्हणाले, “शेजारच्या खोलीत बैस आणि हे सर्व पुस्तक सुवाच्च अक्षरात लिहून काढ. मग बघू!” अगदी मऊसूत आवाजात त्यांनी हे सांगितलं असलं तरीही त्यामागची जरब, वजन मला जाणवलं असावं बहुधा. मी गुपचूप शेजारच्या खोलीत बसून ते पुस्तक लिहून पूर्ण करून दाखवलं. माझ्या या कृत्याचं त्यांनी कौतुकही केलं. आणि तोवर मी माझे हट्ट पार विसरून गेलो होतो. आपल्या मनावर ठेवण्याच्या संयमाचा हा वस्तूपाठ असेल, जो त्यांनी अतिशय वेगळ्या तर्हेनने मला दिला.
अण्णांच्या शिकवणीतला असाच काहीसा भाग, स्वभाव माझ्यातही नकळत रूजलाय आणि आज जेव्हा मी माझ्या २७ वर्षांच्या कौस्तुभ आणि सौरभ या जुळ्या मुलांशी वागतो – बोलतो त्यावेळी आमच्या गप्पा, संवाद हे अगदी खेळीमेळीने, मैत्रीच्या स्तरावर होतात, हे मी खात्रीने सांगू शकतो.

Tuesday, July 27, 2010

आठवणींच्या ओघात

१९८६ला धनंजय परत पुण्याहून मुबईत आला. एखादं मुल जसं काही कारणास्तव काही काळ घरादारापासून, आपुलकीच्या धाग्यांपासून दूर रहातं आणि नंतर परत येतं ते कायमसाठी, तसं काहीसं धनंजयच्या बाबतीत झालं. त्याचे विखुरलेले लेखक, चित्रकार आनंदाने या परिवारात परत आले. मी मा. यशवंत रांजणकरांना भेटलो आणि कथा देण्याची त्यांना विनंती केली, अर्थातच त्यांनी तत्काळ ती मान्यही केल्याने काम करायला एक हुरूप आला. जरा बिचकतच मी त्यांच्यासमोर मानधनाविषयी बोलणं काढताच ते म्हणाले, “अरे, आपलं नातं हे काका पुतण्याचं आहे. व्यवहार आम्ही शंकररावांशी केला. आम्हाला त्यावेळेस मानधन मिळाले. आता मी धनंजयसाठी, स्वानंदासाठी लिहीन. धनंजय पुन्हा एकदा मुंबईत आला यातच आनंद आहे.”
असाच काहीसा अनुभव चित्रकार र. स, कंटक आणि अन्य काही जुन्या लेखकांना भेटताना आला. ती. अण्णांची पूर्वपुण्याई आणि धनंजयचा इतक्या वर्षांचा दर्जा काय आहे, ते समजत होतं. कंटकांबद्दलची खास आठवण माझ्या बालपणाशी बांधलेली आहे. आठवी, नववीत मी एलिमेंटरी, इंटरमिजिएटच्या ड्रॉइंग परीक्षांना बसलो असताना कंटक पतीपत्नींनी मला मोलाचे मार्गदर्शन केले होते. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांचे इंपोर्टेड कलर ब्रश, रंग त्यांनी मला वापरायला दिले होते. मी चितारलेलं सूर्यफुल, जास्वंदी, निसर्गचित्रं यांचंही त्यांनी कौतुकच केलं.. म्हटलं तर किती छोटे छोटे प्रसंग...पण मनावर नकळतच किती कायम ठसा उमटवून जातात नं.
काळाप्रमाणे बदलणं आवश्यक असतं. धनंजयला अधिकाधिक वाचकाभिमुख करण्यादृष्टीने तेव्हा फॉर्मात असलेल्या लेखकांना भेटलो. यात सायन्स टुडेचे संपादक डॉ. बाळ फोंडके, दक्षताचे संपादक व.कृ. जोशी, सुहास शिरवळकर, रामचंद्र सडेकर, सुरेश वैद्य, चिंतामणी लागू.....अशा आणि कितीतरी जणांनी धनंजयसाठी लिहायला सुरवात केली. यामुळे पुन्हा एकदा धनंजयला बहर आला. जुन्या वाचकांना नवीन वाचक येऊन मिळाले आणि वाचकांचा प्रवाहो चालला.... एकीकडे आपण वाचकवर्ग कमी झाल्याची ओरड ऐकतो असतो. परंतु मला अभिमानाने सांगावंस वाटतं, की धनंजयची प्रिंट ऑर्डर, वाचकसंख्या दिवाळी २००९ मध्ये १९६९- ७० च्याही पुढे गेलेली आहे.... हे काही क्षणात घडलेलं मिरॅकल नाही, ते आहे टिमवर्क! तुमच्यासारख्यांच्या साथीने आकाराला आणि प्रत्ययाला आलेलं.

Friday, July 23, 2010

८.४१ ची लोकल

आपल्या प्रत्येकाचं वर्षभरांचे बर्या पैकी नियोजन असतं. अगदी चोवीस तासांचसुद्धा असावं. कारण येणार्याप त्या क्षणांसाठी आपण आत्ता आनंदात असतो. उत्सुकता, उत्कंठा रक्तात लयबद्ध लाटा निर्माण करतात. कल्पना करा, लाल रंगाचा, दाट रक्ताचा तुमच्या शरीरात उसळणारा समुद्र. आणि आपण आपल्या आतल्या डोळ्यांनी किनार्याठवर तटस्थतेने शांत बसून तो न्याहाळतोय......
गेली २१ वर्षे मी दररोज सकाळी ८.४१ची लोकल बोरिवलीहून पकडतोय. पूर्वी ती १ वा २ प्लॅटफॉर्मवरून सुटत असे, आता मात्र सातवरून निघते. तिच्या वेळेत एकूणच रेल्वेच्या बदलत्या वेळापत्रकानुसार एक-दोन मिनिटं मागेपुढे काय तो बदल. या दैनंदिन प्रवासाने मला अर्थात राजेंद्र शंकरराव कुळकर्णीला अनेक सुहृद जोडून दिले. माणसांचे नाना नमुने या एका अखंड प्रवासादरम्यान तुम्हाला बरंच काही देऊन जात असतात.
आमचा ग्रुपही असाच अफाट आहे. कोणीही एका फिल्डमधला नाही. त्यामुळे आपोआपच विषयांचं वैविध्य, आपापल्या मतांची देवाणघेवाण, वाद हा सगळा मामला आलाच. एकमेकांना खेचण्यात, टपल्या मारण्यात, घोळात घेण्यात ही मंडळी एकदम पटाईत.... तरीही हे सारं एका ठराविक मर्यादेत, परस्परांना सांभाळून घेतच सुरू असतं हे सांगायला नकोच. आजारपणात, आनंदाच्या प्रसंगी जवळ येणारे, वर्षातून किमान एकदा फॅमिलीसह पिकनिकला जाणारे आम्ही सारे. आमच्या ग्रुपमधल्या प्रत्येकाजवळ त्यातल्या सभासदांच्या नाव पत्ता, मोबाईल नंबर्स, ई मेल सह अद्ययावत यादी असतेच. इमर्जन्सीमधे हाच माहितीचा दस्तावेज मदतीला आधी धावून येणार आहे. मी इथे मुद्दाम या सभासदांची यादी देतोय....त्यातलं वयाचं अंतर, शिक्षण – व्यवसाय ह्यात महद् अंतर असलं तरीही माणूसकी आणि आपुलकीच्या नात्याची ओढ कसं प्रत्येकालाच बांधून टाकते, हे त्यातून उदाहरण म्हणून समजून यावं, एवढाच त्यामागील हेतू.
१. क्रिसेंट फर्नांडिस(७१) ए.सी.चा व्यवसाय, २. स्वामिनाथन(६५) बिर्ला ग्रुप- जी.एम. ३. नाना नाखरेकर( ६२) सौभाग्य अॅड एजन्सी, ४. विभाकर पारेख(६२), ५. उन्नीकृष्णन(५६) असि. डायरेक्टर नॅशनल सेफ्टी कौन्सिल, ६. जयराम आहुजा( ५६) फर्निचर बिझनेस, ७. विजयकुमार (५१) कलानिकेतन, ८. किरण साने(४९) वेस्टर्न रेल्वे, ९. देवेंद्र देशमुख(३६) इंजिनिअर, १०. अॅडली फर्नांडिस(३५), ११. सौरभ पाटील(३४) इंजिनिअर, १२. अभिषेक चौधरी( ३१) एम.एस.सी.बी., १३. सिद्धेश भोळे( २७) वकील, १४. राजशेखर पेडणेकर(४१) न्यू इंडिया अॅश्युअरन्स बँक, १५. राजू बावडी(३८) सचिवालय, १६. भूषण गांगल (२१) सी.ए. चा विद्यार्थी, हा आणि ह्याचे दोन मित्र बोरिवलीहून पार्ले टिळक शाळेत जायचे तेव्हापासून आमच्या ग्रुपमधले....यादी अजून मोठी होईल..तूर्तास इतकंच म्हणतो की, अनेकजण यात येतात- जातात. कधी दुरूनच आमची धमाल बघत असतात, तर कधी आपणहून आमच्यात सामील होतात. आम्हीही त्यांना सामावून घेतो......खेचायला तेवढंच नवं माणूस मिळतं ना महाराज...
परस्परांच्या कामाबद्दल, कार्यक्षमतेबद्दल सगळ्यांनाच कल्पना आहे. रोजच्या घडामोडींपासून ते अगदी वैयक्तिक सुखदुखांच्या अवकाशात तितक्याच समरसतेने मिसळणारे आम्ही... हा ग्रुप माझ्यासाठी टॉनिक आहे, त्यांच्या सहवासात प्रोत्साहन तर मिळतंच, शिवाय मनावरचे ताण काहीसे हलके व्हायलाही मदत होते. प्रवास मग तो रेल्वेचा असो किंवा आयुष्याचा त्याच्या मार्गावर भेटणारा प्रत्येकजण आपल्यासाठी त्याच्या अनुभवांची शिदोरी घेऊन येत असतो आणि आपण सारेच अखेरपर्यंत जीवनाचे अनेक रंग, पैलूंशी या ना त्या रूपात बांधले जातो, शिकत जातो...समृद्ध होत जातो.

Thursday, July 22, 2010

संपादकाची पत्नी काय?

संपादकाची पत्नी काय? .....चांगलीच जिरली.
नमस्कार, मी नीलिमा राजेंद्र कुळकर्णी.... आठवणींच्या गावात गेलं की काय सांगू आणि कसं सांगू?, असाच प्रश्न पडतो. आमचं लग्न ठरलं तेव्हा असं कळलं होतं की, राजेंद्र कुळकर्णी हे धनंजय चे संपादक आहेत. एक आर्किटेक्ट आणि लॉ केलेली व्यक्ती संपादकही आहे, हे ऐकून छानच वाटलं होतं. तोवर संपादकाच्या चिंता, अडचणी, व्याप या सगळ्याशी परीचित व्हायचे होते. माहेरी असतेवेळी पुस्तकं, अंक वाचण्याखेरीज संपादक वा प्रकाशक या नावाशी ना व्यवसायाशी माझा कधी संबंध आला होता. त्यामुळे मगाशी म्हटलं तसं त्यामागचं इंगित कळण्याचा काही सवालच नव्हता.
१९८६मधे ह्यांनी धनंजयची सूत्रं आपल्या हाती परत घेतली तेव्हा सणवार नाही, सुट्टी नाही, दिवस म्हणू नका रात्र म्हणू नका...हे आपले सतत त्याच विषयात आणि त्याच कामात गढून गेलेले. अशाने मी अतिशय कंटाळायचे. पण नंतर कसं कोण जाणे मीही त्याच कामाचा एक भाग बनून गेले. अंदाजाने प्रूफ करेक्शन आणि दिवसभर ऑफिस सांभाळणे, पार्सलिंग, पोस्ट, ट्रान्सपोर्ट ह्या सर्व वेळखाऊ कामाच्या जबाबदार्यार मी घेतल्या. कारण दिवसा ह्यांची नोकरी असे.
असेच पावसाळ्याचे दिवस होते..महिन्याचा अंक तेव्हा सुरू होता. अन् मुलांना शाळेला सुट्टी होती. ती तेव्हा असतील ४-५ वर्षांची. पोस्टाचे कन्सेशन घेतलेले असेल तर त्याच तारखेला अंक पोस्ट करावा लागतो, म्हणून मी थेट प्रेसमधे गेले. अंक बाईंड करून टॅक्सीत घातले आणि पोस्ट ऑफिसपाशी आले. मुलांना फुटपाथवर उभं करून अंक टॅक्सीच्या डिकीतून काढून फुटपाथवर ठेवत होते. अन् तेवढ्यात एका बंडलाची दोरीच तुटली, अंक रस्ताभर विखुरले.. मदतीला कुणीच नाही. कुणा हमालाला बोलवावं तर मुलांजवळ कोण रहाणार?.. हा सारा गोंधळ कमी होता म्हणून की काय पावसाने त्यात आपलीही भर घातली. ... ह्या सगळ्या प्रकाराने माझ्याही डोळ्यात पाऊस दाटलेला... नशिबाला दोष देत, ह्यांच्यावर वैतागत माझी मीच त्या भरल्या पावसात कामाला लागले. संपादकाची पत्नी काय असतं, ते तेव्हा कळलं....
पार्सल ऑफिस आणि मी

कामाची पुरेशी ओळख नसताना कशी एकेक भंबेरी उडते, ते आज आठवून हसायला येतं. पण तेव्हा मात्र नको जीव व्हायचा. अशीच एक गोष्ट पार्सल ऑफिसची. रेल्वे पार्सलचं काम ९८६ -८७ पासून मीच करत होते. महिन्यातून एकदाच भरपूर काम असल्याने चांगला पगार देऊन मदतनीस ठेवणं तेव्हा परवडणारं नव्हतं आणि कमी पगारावर कुणी मिळायचंही नाही. तेव्हाचं व्हि.टी. स्टेशन आताचं सी.एस.टी. बाहेरगावी जाणार्यां गाड्यांच्या फलाटालाच लागून तेव्हा गोडाउन कम पार्सल ऑफिस होतं. पूर्णपणे पुरूषांचीच मक्तेदारी असलेल्या त्या ऑफिसमधे हमाल येऊन पार्सलं काट्यापाशी नेऊन धाडदिशी टाकून निघून जायचे. मग एकेका पार्टीचं पार्सल उचलून काट्यावर टाकायचं, ते बाजूला करून दुसरं टाकायचं. मी नवखी, त्यात कुणाशीही ओळख नाही, त्यामुळे सुरवाती सुरवातीला माझी होणारी तारांबळ बघत सारे उभे असायचे. नंतर पुढे माझं जाणं नेहमीचं झाल्याने तेथील हफीजभाईंशी आणि नंतर नामजोशींशी ओळख झाली आणि काम काहीसं सुकर झालं.
आणि आता तर पार्सल ऑफिसही सुधारलं आहे आणि माझ्या ओळखीही वाढल्या आहेत.

Wednesday, July 21, 2010

पन्नास वर्षांचं नातं....

१९६१ साली धनंजयची सुरवात झाली. कल्पना अर्थातच ती. अण्णा म्हणजे शंकरराव कुळकर्णींची. कविवर्य श्रीकृष्ण पोवळे, प्रसिद्ध लेखक – संपादक बा.द. सातोस्कर (दै. गोमंतक), यशवंत रांजणकर, र.स. कंटक अशा सहृदांची साथ त्यांना यात लाभलेली. विषयाच्या मांडणीपासून ते अगदी सादरीकरणापर्यंतच्या वैविध्यामुळे सुरवातीपासूनच धनंजयला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. पहिली १४ वर्षे आपण मुंबईहून अंक काढीत असू. त्यानंतर ११ वर्षे पुण्याहून सदानंद प्रकाशनचे स.म. खाडिलकर हा अंक काढायचे. अण्णांची प्रकृती ठिक नव्हती, तशातच आर्थिक अडचणींचे तर डोंगर समोर उभे ठाकलेले होते. धनंजय सारखा वाचकप्रिय अंक बंद करणं हे देखील योग्य नव्हतं. कुठल्याही नियतकालिकामधे शीर्षक चालू राहणं, अस्तित्वात असणं, वाचकांसमोर ते सतत झळकणं आवश्यक असतं. म्हणून ते काही काळ पुण्यातून काढण्यात आलं. अंकाचा मालकी हक्क आपलाच असला तरी तो काही काळापुरता करार होता. तो आपल्या हातून अन्य कुणाहाती सोपवताना ती. अण्णांना किती यातना झाल्या असतील, आपण समजू शकतो. कदाचित, अण्णांचा आतला आवाज त्यांना सांगत असावा, की अंक नक्कीच परत मुंबईत येईल आणि तो आपणच काढू.
२८ ऑगस्ट १९७७ (नारळी पौर्णिमा) ला अण्णा गेले. मी त्यावेळेस दुबईला होतो. माझं दुबईला जाणं तेव्हाच अत्यावश्यकच बनलं होतं. प्रकाशन व्यवसाय आणि आर्थिक बाजू यांत नेहमीच रस्सीखेच असते. कल्पनांना पंख लावून भरार्याौ मारणं सोपं वाटत असलं तरीही त्यांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पैशांचं पुरेसं पाठबळ असणं आवश्यकच असतं. आणि ते पुरेसं नसतानाही जिद्दीने घेतला वसा नेटाने तडीस न्यायचा तर मग जोखीम पत्करण्याइतकं वाघाचं जीगर हवं. ते अण्णांकडे होतं. मोठ्या नेमाने आणि प्रामाणिकपणे त्यांनी अंकाचे काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. पण झालं असं की, एका बाजूला आर्थिक मेळ बसेनासा झाला आणि कर्जाचे आकडे वाढायला लागले. मी आर्किटेक्ट झालो होतो. आणि या परिस्थितीतून घराला – कुटुंबाला बाहेर काढायचं या निर्धाराने मी दुबईला गेलो. वडीलांजवळ आम्हा दोघांपैकी एकाने असणं गरजेचं असल्याने माझ्या मोठ्या भावाने ती जबाबदारी हिमतीने पेलली. त्यानेही एकीकडे नोकरी सांभाळत घर जपलं. माझा मोठा भाऊ मोहन आणि मी (राजेंद्र कुळकर्णी) दोघांनी घरच्या जबाबदार्याे अशा आपणहून स्वीकारल्या होत्या.
४ जानेवारी १९८६ ला मी मुंबईला कायमचा परतलो आणि दुसर्याय दिवसापासून कामाला सुरवात केली. धनंजय व चंद्रकांत परत मुंबईला आणले. या सगळया घडामोडींदरम्यान माझं लग्न ठरलं होतं. परतल्यानंतर लग्न झालं आणि या सगळ्या डोलार्या.ला सावरायला दोनाचे चार हात कामी आले. त्यात दोन आणखी लहान हातांची भर पडली , ती होती चि. कौस्तुभ आणि चि. सौरभ ची. आमची शक्ती आता नि:संशय वाढली होती. आमच्या चौकोनी कुटुंबाचा विस्तार षट्कोनी कुटुंबात झाला होता. चमकू नका असे..... अण्णांची लाडकी धनंजय आणि चंद्रकांत ही दोन मुलं मी नि नीलिमाने दत्तक घेतली. अशी आमची झाली चार मुलं...
काही कारणाने दूर गेलेल्या एकेका लेखकाला, चित्रकाराला पुन्हा नव्याने भेटलो. मधल्या काळाच्या भिंती जणू पुसून गेल्यासारखं सार्यां नीच उत्तम प्रतिसाद दिला आणि धनंजय, चंद्रकांत वरील प्रेमामुळे आमचा श्रीगणेशा चांगला झाला.......

Saturday, July 17, 2010

धनंजय चित्रपट......


पटकन आठवण येते ती फार पूर्वीच्या “धनंजय” चित्रपटाची. बाबुराव अर्नाळकरांच्या कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटाकडून रहस्यकथाप्रेमींना खूप अपेक्षा होत्या. पण हा चित्रपट सो सो च होता. याचं संगीत सी.रामचंद्र यांचं होतं. आणि ते स्वत: च नायकाच्या म्हणजेच धनंजयच्या भूमिकेतही होते. हं.......पण त्यांना म्हणावं तसं काम काही ते जमलेलं नव्हतं. परंतु त्यांचं उंच, धिप्पाड व्यक्तिमत्त्वं अजूनही डोळ्यांसमोर आहे. कमर्शियली हा चित्रपट फ्लॉप गेला असणार, मी तर त्यावेळेस अगदीच लहान होतो हो... मात्र गिरगांवातल्या मॅजेस्टिक थिएटरबाहेर लावलेलं व्हायोलिन वाजविणार्याे सी. रामचंद्रांचं पोस्टर अद्यापही लख्खं स्मरणात आहे. “जीवाच्या सखीला कितीदा पुकारू, किती साद घालू, किती हाक मारू,” हे त्यांच्या अवीट संगीताने नटलेलं गाणं कानात रूंजी घालतंय.
आठवणी म्हणजे वेगवान टाईम मशिनच. त्यात बसणं आपल्या हाती नसतंच मुळी. क्षणात त्या कुठल्याकुठे आपल्याला नेतात आणि त्या प्रसंगांमधे रमताना वेळ कसा भर्रकन सरतो.......कळतच नाही...!
टू हेल अॅण्ड बॅक
अतिशय गाजलेला आणि आजही लोकप्रिय असलेला युद्धपट. नायक “ऑडी मर्फी” स्वत: त्या महायुद्धात होता. त्याने स्वत चीच भूमिका त्यात साकारली आहे. त्यामुळे आपोआपच त्या चित्रपटाला एक इमोशनल टच आलाय.
युद्ध संपल्यावर त्याला शौर्यपदक मिळतं. पदक स्वीकारत असताना त्याच्या नजरेसमोर युद्धात वीरगती मिळालेल्या त्याचे मित्र येतात आणि त्यांच्या आठवणीने त्याचे डोळे पाणावतात.
आज अगदी हिच अवस्था माझीही झाली आहे. यंदाचं हे “धनंजय” चं सुवर्णमहोत्सवी वर्ष. साहजिकच, या वर्षीच्या धनंजयची तयारी करताना मन अधिक कातर झालंय. या दिवाळी अंकाची जुळवाजुळव करतेवेळी ती. शंकरराव कुळकर्णी (अण्णा), आई (इंदूताई) आणि या मासिकासाठी योगदान दिलेल्या आणि आज आपल्यात नसलेल्या लेखकांची हटकून याद येतेय.
आपल्या सगळ्यांचंच असं होतं नाही! आनंदाच्या आणि दुखा: च्या क्षणी आपल्यातील प्रत्येकाला आठवण सतावते ती आपल्याजवळ नसणार्यां ची.... एकट्या मनाला या आठवणीच आगळी उभारी देतात...

Friday, July 16, 2010

वेलकम टू धनंजय फॅमिली !


धनंजय शब्द उच्चारताच क्षणात डोळ्यांसमोर साहस, शक्ती, शौर्य, युद्ध, हेर, रहस्य, संदेह असे विषय येतात. धनंजय म्हणजे अर्जुन आणि मराठी रहस्यकथा वाचक प्रेमींसाठी धनंजय – छोटू जोडी. सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखक बाबुराव अर्नाळकर यांच्या वाचकप्रिय नायकांमध्ये धनंजयला मानाचे आदराचे स्थान आहे. कदाचित या नावाने - व्यक्तिमत्त्वाने भारावून आकर्षित होऊन प्रकाशक आदरणीय शंकरराव कुलकर्णी (अण्णा) यांनी धनंजय मासिक १९६१ साली सुरु केले. रहस्यकथांचा बादशहा असेच धनंजयला संबोधले जायचे.

दिवाळी २०१० म्हणजे धनंजयचे ५० वे वर्ष – सुवर्णमहोत्सवी वर्ष.

१९६१ ते २०१० असा वेगळ्या विषयांवरील या मासिकाचा प्रदीर्घ प्रवास आणि तोही आलेख उंचावणारा. ग्रेट. आनंद आहेच त्याचवेळी मागे वळून पाहताना खूप आठवणी येतात. आत्तापर्यंत फक्त धनंजयमधून - प्रिंट मिडीयातून संवाद करायचो.

आजपासून सर्वांशी आजच्या माध्यमातून नातं जोडूया.....

रहस्य- गूढ या विषयांना दुय्यम स्थान मिळत असल्याकारणाने त्या विषयांना प्राधान्य मिळावे आणि लेखकांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने १९५५ मध्ये शंकरराव कुळकर्णी रहस्यरंजन मासिक काकतकर यांच्यासोबत एकत्रित काही वर्ष काढायचे.

आपल्या सर्वांना एकमेकांशी मस्त बिनधास्त गप्पा मारायच्या आहेत. निमित्त धनंजयचं असलं तरी विषयाला बंधन आसायलाच हवं असं नाही. कदाचित मला माहीत नसलेले धनंजयला पूरक असे नवीन विषय तुमच्याकडून मिळतील. धनंजयचे आधीचे अंक पाहिलेत तर लक्षात येईल की, आपल्या लेखकांत ५० टक्क्यांहून अधिक साहित्य नवोदित लेखकांचे असते. भन्नाट विषय त्यांच्याचकडून मिळतात .लेखनाची स्टाईल एकदम फ्रेश आजची. एक नक्की धनंजयला नवीन मित्र परिवार मिळणार.

वेलकम टू धनंजय फॅमिली.