Wednesday, July 28, 2010

वेगळीच शिक्षा



आम्हां सर्व भावंडांपैकी कोणालाही अण्णांनी कधी चार बोटं लावल्याचं किंवा रागावल्याचं स्मरत नाही. ते अतिशय प्रेमळ होते. गांधीवादी विचारसरणीचा, सानेगुरूजींच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव असल्याने मुलं म्हणजे देवाघरची फुलं ही भावना ठायीठायी भिनलेली. आदरणीय सानेगुरूजींची काही पुस्तके अण्णांनी प्रकाशित केली होती. ते आमच्या घरीदेखील येत असत म्हणे. अण्णा आणि त्यांच्यात झालेला पत्रव्यवहार, करारपत्र लहानपणी पाहिल्याचं आठवतंय. त्यावर मा. मोहन धारियांची स्वाक्षरी असल्याचंही आठवतंय, कदाचित मध्यस्थ किंवा विटनेस म्हणून केली असावी. हे आता काहीच अस्तित्वात नाही. माझं बारसं झालं त्यावेळी ते उपस्थित असल्याचं ऐकलं होतं. त्यांनीच मला मांडीवर घेत राजेंद्र हे नाव ठेवलं होतं. माझ्यानंतरच्या लहान बहिणीचं नावही त्यांनीच सुचवलं होतं – साधना. ती माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान. पण दुर्दैवाने त्यावेळेस सानेगुरूजी नव्हते.
दोन भाऊ आणि तीन बहिणींमधे मीच काय तो मस्तीखोर, बंडखोर होतो. माझा नंबर चौथा असल्याने माझ्या ह्या करामती सगळ्यांच लक्ष माझ्याकडे जावं म्हणूनही असतील. आईच्या हातून खरपूस मार खाल्लाय पण अण्णांचा.......अंहं..! दहा वर्षांचा असतानाचा एक प्रसंग सहज समोर येतोय. दुकानात अण्णा कामात गढून गेले होते. त्यांच्याकडे काही माणसं आली होती आणि अशावेळेस मी त्यांना छळत होतो. बहुतेक मला काहीतरी हवं होतं आणि त्याचा लकडा मी त्यांच्यामागे लावला होता. त्या माणसांशी बोलत बोलत त्यांचं काम सूरू असताना माझी ही भुणभुण ते कानाआड करत होते. दोन-तीन वेळ त्यांनी ऐकून घेतलं आणि शांत नजरेने त्यांनी माझ्याकडे वळून पाहिलं. म्हणाले, “थांब जरा.” ते आता काय करतात त्याची उत्सुकता मलाही लागलीच होती आणि थोडी धास्तीसुद्धा. त्यांनी छोटंसंच एक बालवाङ्मयाचं पुस्तक आणि चाळीस पानी वही, पेन्सिल मला दिली आणि म्हणाले, “शेजारच्या खोलीत बैस आणि हे सर्व पुस्तक सुवाच्च अक्षरात लिहून काढ. मग बघू!” अगदी मऊसूत आवाजात त्यांनी हे सांगितलं असलं तरीही त्यामागची जरब, वजन मला जाणवलं असावं बहुधा. मी गुपचूप शेजारच्या खोलीत बसून ते पुस्तक लिहून पूर्ण करून दाखवलं. माझ्या या कृत्याचं त्यांनी कौतुकही केलं. आणि तोवर मी माझे हट्ट पार विसरून गेलो होतो. आपल्या मनावर ठेवण्याच्या संयमाचा हा वस्तूपाठ असेल, जो त्यांनी अतिशय वेगळ्या तर्हेनने मला दिला.
अण्णांच्या शिकवणीतला असाच काहीसा भाग, स्वभाव माझ्यातही नकळत रूजलाय आणि आज जेव्हा मी माझ्या २७ वर्षांच्या कौस्तुभ आणि सौरभ या जुळ्या मुलांशी वागतो – बोलतो त्यावेळी आमच्या गप्पा, संवाद हे अगदी खेळीमेळीने, मैत्रीच्या स्तरावर होतात, हे मी खात्रीने सांगू शकतो.

No comments:

Post a Comment