Wednesday, September 8, 2010

अजब योगायोग


गेल्या वर्षी ८ सप्टेंबर २००९ मधे मा. प्रभाकर पेंढारकरांचं एका स्टुडिओचे आत्मवृत्त पुस्तक प्रकाशित झालं. आणि वर्षभरातच या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या तर निघाल्याच शिवाय त्या पुस्तकाला केसरी मराठा ट्रस्ट, पुणे यांचा उत्कृष्ट स्मृतिग्रंथाचा न.चिं. केळकर ग्रंथोत्तेजक पुरस्कारही मिळाला. खरंच, पुस्तक प्रकाशनाला घेताना त्यामागची सगळी धावपळ, दगदग, ओढगस्ती हे एका क्षणात अशा कौतुकाने, वाचकांच्या अलोट प्रेमाने क्षणात गायब होऊन जातं आणि अधिक चांगल्या कामासाठी एक उमेद तनामनात ग्लुकोजसारखी भिनत जाते.
असो, आजचा विषय तो नाहीच. गेल्याखेपेस मी म्हटलं होतं की, पेंढारकरांविषयी मी ओघात पुढे सांगेन. तर त्याच एका अनाहूतपणे जुळून आलेल्या योगायोगाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करतो. मा. पेंढारकरांचं कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओची आत्मकथा सांगणारं एका स्टुडिओचं आत्मवृत्त हे पुस्तक प्रकाशित करण्याचं भाग्य आम्हांला लाभलं. या पुस्तकावर दीड दोन वर्ष काम करीत होतो. पेंढारकरसाहेबांच्या अमोल शब्दांना चित्रकार संजय शेलार यांचे तितकेच बोलके मुखपृष्ठ, अप्रतिम पेन्सिल रेखाचित्रे आणि सुलेखनकार अच्युत पालव यांचे सुलेखन असा झकास मेळ यानिमित्ताने साधून आलेला होता. आता पुस्तक छपाईला जाण्यापूर्वी त्याच्या एका बाजूच्या पानावर इम्प्रिंट – प्रकाशक, लेखक, आवृत्ती वगैरे माहितीचा भाग टाईप केलेला असतो, ते महत्त्वाचं काम होणं बाकीच होतं. आणि तो महिना ऑगस्टचा होता. पेंढारकरांना ते पुस्तक २ जुलै रोजी म्हणजे आदरणीय भालजी पेंढारकरांच्या स्मृतिदिनी ते प्रसिद्ध व्हावे, असं वाटत होतं. मात्र ते शक्य नव्हतं. त्यामुळे दुसरा चांगला दिवस कोणता निवडता येईल, ते शोधत होतोच.
केवळ याचा मीच विचार न करता आणखीही काहीजणांची मतं मी चाचपडत होतो. त्यात पेंढारकर कुटुंबातल्याच श्रीकांत डिग्रजकरांना मी विचारलेलं होतं. पेंढारकर  साहेबांचा वाढदिवस कधी असतो? आठ  सप्टेंबर!” माझ्यादृष्टीने तो  दिवस योग्य होता आणि महत्त्वाचं म्हणजे पुस्तकही तोवर तयार होणार होतं. खुंटी हलवून बळकट करण्यासाठी पुण्याला सौ. इंदुताई पेंढारकरांशी बोललो. त्यांनीही आठ सप्टेंबर तारखेला दुजोरा दिला. माझ्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. शेवटी प्रभाकर पेंढारकरांच्या कानावर हे सगळं घालून त्यांची पुस्तकाच्या प्रकाशनाविषयी परवानगी घेतली. आणि पुस्तकावर इम्प्रिंटच्या पानावर प्रथम आवृत्ती ८ सप्टेंबर २००९ अशी घातली. पुस्तक छपाईला रवाना झालं. वाचकहो, योगायोगाची गोष्ट म्हणजे ८ सप्टेंबर हा दिवस मदर मेरी, प्रख्यात गायिका आशा भोसले यांचाही जन्मदिन आणि माझ्यासारख्या एका धनंजयप्रेमी माणसाचाही. गंमतीचा भाग म्हणून ही गोष्ट पेंढारकरांच्या कानावर घालताच लेखक, प्रकाशकाच्या आणि पुस्तक प्रकाशनाच्याही एकाच दिवशी जुळून आलेल्या अजब योगाला त्यांनीही व्वा, व्वा!” म्हणत दिलखुलास दाद दिली आणि या पुस्तकाने किती समाधान मिळवून दिलं, हे कोणत्या शब्दांत व्यक्त करू?.... माझे शब्दच थिजून जातात.

Friday, September 3, 2010

टोपण नावाचं रहस्य


वाचकांशी आमचा संवाद वर्षातून एकदाच दिवाळी अंकाच्या माध्यमातून होत असतो. वाचकांचा सहवास लाभावा आणि त्यांच्याशी संवादही वाढावा याकरिता २००५ आणि ०६ साली धनंजय आणि चंद्रकांतचे वासंतिक विशेषांक प्रकाशित केले. त्यावेळी २००६च्या चंद्रकांतच्या विशेषांकासाठी एका नवीन लेखकाची कथा आली. त्यांचं नाव होतं, अनंत अग्निहोत्री. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लेखकाचा पत्ता ना हस्तलिखितावर होता ना पाठवलेल्या पाकिटावर किंवा साधं दोन ओळींचं पत्रही त्यात नाही. काहीशा अचंबित अवस्थेतच कथा वाचली. उत्तम होती. लेखकाचं नाव जरी नवीन असलं तरीही कथा घ्यायची, असं ठरवलं. नेमक्या शब्दांत मांडलेली, हृदयस्पर्शी कथा लिहिणार्‍याचा शोध घ्यायला हवा, असं मनानं घेतलं. का कुणास ठाऊक पण ते पाकिट जपून ठेवलं होतं. त्या पाकिटावर, हस्तलिखितावर जरा काहीशा बारकाईने आणि उत्सुकतेनेच नजर रोखली. बस्ताक्षर परिचयाचं वाटलं. लेखनाचा दर्जा हा कसलेल्या लेखकाचा होता. पाकिटावर पुण्याचा पुसटसा स्टँप होता. मनं सांगत होतं, की ह्या गूढ लेखकाचा ठावठिकाणा लवकरच लागणार. अण्णांच्या वेळचे सिनिअर मोस्ट टॉपचे लेखक – त्यांना फोन केला. सुरवातीला काहीच बोलले नाहीत. याबाबत आपल्याला काहीच कल्पना नाही, असं म्हणाले. मीही हेका सोडायला तयार नव्हतोच. बेधडकपणे सांगून टाकलं, मानधनाचा ड्राफ्ट मी तुमच्याच नावे पाठवतो आहे, कारण हस्ताक्षर तुमचंच आहे. माझ्या ठाम पवित्र्यापुढे त्यांचा बहुतेक नाईलाज झाला असावा, त्यांनी अखेरीस मान्य केलं, की तेच अनंत अग्निहोत्री आहेत. नवोदित लेखकाला अंकात स्थान मिळतं किंवा नाही, हे त्यांना पहायचं होतं. आणि तशातही त्यांना नेहमीच्या भय कथा, गूढ कथेपेक्षा वेगळी सामाजिक कथा लिहायची होती..... ते अनंत अग्निहोत्री म्हणजे नारायण धारप होते. धनंजयकरिता दिवसरात्र एक करता करता या घटनेने क्षणभर का होईना, मला धनंजय झाल्याचं समाधान मिळालं. इतकंच नाही तर नारायण धारपांनीदेखिल मी अनंत अग्निहोत्री असं टोपण नाव धारण करणारा खरा कोण ते शोधून काढल्याबद्दल माझं कौतुक केलं. संपादकाच्या पाठीवर ज्येष्ठ साहित्यिकांची अशीही थाप दुर्मिळच नाही का?

Wednesday, September 1, 2010

तृतीय नेत्र उघडला...


परवाच्या शनिवारी (२८ ऑगस्ट २०१०) निवडक धनंजय तुतीय नेत्र चे धनंजय स्टाइलने प्रकाशन झाले. नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या हस्ते आणि लेखिका  अनुराधा वैद्य, लेखक –पटकथाकार, दिग्दर्शक मा. यशवंत रांजणकर, प्रो. डॉ. शिरीष गो. देशपांडे यांच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न झाला.
मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहात सुरवातीस लेखक – वाचक ओळख, चर्चेतून एक मनमोकळा संवाद घडला. धनंजय अंकाच्या प्रारंभापासून ज्या व्यक्तींचा स्नेह जुळला अशांपैकी काही व्यक्ती या समारंभामधे सामील झाल्याने खर्‍या अर्थाने हे सुवर्णक्षण वेचण्याजोगे झाले होते. कै. शंकरराव कुलकर्णी यांनी रहस्यकथा, गूढकथा आदी दुर्लक्षित साहित्यप्रकाराला एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा जो चंग बांधला होता; त्याचा वटवृक्ष होताना त्यांच्या काही सुहृदांना तो पाहण्याचे भाग्य मिळणे, ही नक्कीच धनंजय परिवाराकरिता आनंदाची बाब होती. कै. शंकररावांशी परीचित असणार्‍यांनी आपल्या याबद्दलच्या कृतज्ञता यावेळी व्यक्त केल्या. हे खरं तर आज काम करणार्‍यांकरिता आशीर्वादापेक्षा कमी नव्हतंच. अण्णांनी पाठीवर शाबासकीची थाप दिली, असं वाटावं इतकी भावूकता त्या प्रसंगी दाटून आली होती.
लेखक वाचक ओळख, संवादाच्या कार्यक्रमाचे एका मारवाड्याची गोष्ट, कृष्णनीति लिहीणारे लेखक गिरीश जाखोटिया अध्यक्ष होते. तर लेखक प्रतिनिधी म्हणून शुभदा गोगटे आणि बशीर मुजावर वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. रहस्यकथांना आणि त्या कथालेखकांना मिळणार्‍या दुर्लक्षित वागणूकीबद्दल, विज्ञानकथा आणि रहस्य, गूढ कथा यांच्या स्वरूपाविषयीही यात प्रश्नोत्तरे झाली. मुलुंडच्या न. चिं. केळकर ग्रंथालयातील वाचकांचाही यात उत्स्फूर्त सहभाग मिळाला. धनंजयने जोपासलेली वाचनसंस्कृती, विषयांचे दिलेले दर्जेदार वैविध्य याचंही उपस्थितांकडून कौतुक झालं. या सगळ्या प्रोत्साहनाच्या वर्षावाने इथवरच्या वाटचालीचे श्रम कुठल्याकुठे पळाले. येत्या दिवाळीला धनंजय घेऊन येत असलेल्या अनोख्या प्रयोगाचे सूतोवाच यावेळी करण्यात आल्यानंतर सर्वांनाच त्याविषयीची उत्सुकता लागून राहिलेली दिसून आली. त्याविषयी इथे नंतर सांगणारच आहे.
पुस्तक प्रकाशन प्रसंगी गूढ वातावरणाची हलकीशी निर्मिती करून काळोख्या मार्गावरून तृतीय नेत्रंच स्टेजवर आगमन झालं आणि नटश्रेष्ठ पणशीकर यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी बोलताना मराठवाड्याच्या लेखिका अनुराधा वैद्य म्हणाल्या, मुंबई वगळता अन्य महाराष्ट्रातील लेखकांची पुस्तके प्रकाशित करताना दर्जाच्याबाबतीत प्रकाशक फारशी उत्सुकता दाखवत नाहीत. परंतु मला मात्र राजेंद्र प्रकाशनाबाबत वेगळा अनुभव आला. माझी श्वानप्रस्थ कादंबरी प्रकाशित करताना ते माझ्या संकल्पनेबरहुकूम, हव्या त्या पेपर क्वालिटीचं, आकर्षक मुखपृष्ठ असलेलं असं करून देण्यासाठी कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. चंद्रकांतसाठी सामाजिक कथा- कादंबर्‍या लिहिणार्‍या माझ्याकडून त्यांनी गूढ कथा लिहवून घेतली, हे खर्‍या संपादकाचं लक्षण आहे. त्यांच्या वाटचालीस माझ्याकडून अनेक शुभेच्छा!” प्रो. डॉ. शिरीष गो. देशपांडे यांनी तृतीय नेत्र या शीर्षकामागील भूमिका स्पष्ट केली आणि विज्ञान कथा आणि रहस्य कथा यांतील भेदाभेद विशद केला. धनंजयचा  सुवर्णमहोत्सव हा कै. शंकरराव कुलकर्णी यांनी उपेक्षित रहस्यकथांना दिलेल्या हक्काच्या व्यासपीठाचा, त्यांच्या हिकमती विचारी कृतीचा गौरव आहे. राजेंद्र आणि नीलिमा कुलकर्णी या दांपत्याने आणि त्यांच्या परिवाराने यासाठी आजवर घेतलेल्या मेहनतीला मिळालेलं हे फळ आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या शुभेच्छा नोंदवल्या. नटश्रेष्ठ पणशीकरांचा आणि अण्णांचा स्नेह हा खूप जुना, अगदी घरोब्याचा. त्यामुळे त्यांचं असणं हे जणू ज्येष्ठांचाच वरदहस्त डोक्यावर असल्यासारखं होतं. कै. शंकरराव(अण्णा) यांच्याशी असलेल्या स्नेहपूर्ण संबंधांची याद जागवत त्यांनी धनंजयच्या यशस्वी वाटचालीकरता कुलकर्णी दांपत्य आणि परिवाराने घेतलेल्या कष्टांचं कौतुक केलं. आणि पुढील ७५ वर्षांची वाटचाल आपल्याला पहायला मिळावी, अशी सदिच्छाही व्यक्त करत अनेक आशीर्वाद दिले. याप्रसंगी ज्येष्ठ लेखक यशवंत रांजणकर यांचा पणशीकरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सूत्रं नीलिमा कुलकर्णी यांनी सांभाळली होती. या कार्यक्रमादरम्यान लेखक शिरीष कणेकर यांची प्रमोशन आणि राही अनिल यांची रस्त्यावरचं पोर ही कथा प्राजक्त दातार या कॉलेजयुवकाने यथायोग्य प्रभावी वातावरणाचा आभास निर्माण करत वाचली. न.चिं. केळकर ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमाअंती ग्रंथालय अध्यक्ष डी. व्ही. कुलकर्णी यांनी समस्त मान्यवरांचे, उपस्थितांचे आभार मानले.
निवडक धनंजय तृतीय नेत्र पुस्तकामधे गेल्या ५० वर्षांतील मातब्बर लेखकांच्या निवडक कथांचे संकलन आहे. त्यात श्रीकृष्ण पोवळे, र.म. शेजवलकर, अण्णाभाऊ साठे, यशवंत रांजणकर, प्रदीप दळवी, अनंत सामंत, इंद्रायणी सावकार, श्रीकांत सिनकर, राजा पारगावकर, गजानन क्षीरसागर, सुहास शिरवळकर, अनुराधा वैद्य, बा.सी.अष्टीकर, शिरीष कणेकर, व.कृ. जोशी, श्रीकांत मुंदरगी आणि नारायण धारप तर विज्ञानदृष्टी असलेले डॉ. बाळ फोंडके, निरंजन घाटे, शुभदा गोगटे, मोहन आपटे, डॉ. आ.वा. वर्टी अशी लेखक मंडळी आहेत. रहस्यकथांचा हा प्रवाह आज मुख्य साहित्य प्रवाहात समाविष्ट होण्याच्या प्रतिक्षेत आहे. मानवी जीवनाची उकल कलापूर्ण कथात्मकतेने करण्याची ऐपत रहस्यादी कथालेखकांनी कमावलेली आहे. चळवळ करून प्रमुख प्रवाहात शिरण्यापेक्षा सन्मानाने, स्वसामर्थ्याने सामील होण्यासाठी ते उत्सुक आहे. आणि यासाठी आजवर वाचकांचाही उदंड प्रतिसाद लाभल्यानेच हे आत्मबळ त्याला मिळालेलं आहे.. तेव्हा प्रबळ सामर्थ्याने ही उपेक्षा लवकरच सरो आणि आमचे आकाश – अवकाश आम्हांस मिळो, हिच सदिच्छा.