Friday, August 20, 2010

प्रतिमा उत्कट


         आजच्यासारखी टीव्ही चॅनेल्सची रेलचेल किंवा मनोरंजनाची विविध माध्यमं त्याकाळी सर्रास उपलब्ध नव्हती. वाचन हाच काय तो विरंगुळा आणि अभ्यासाचाही भाग असे. वाचनाने कित्येकजण भारावल्याची उदाहरणेही भोवताली आपण ऐकतो, तेव्हा मला माझीही अशीच एक आठवण इथे सांगाविशी वाटते. मी ७वी-८वीत असतानाचा काळ.  आमच्या दुकानात चार आणे माला असत. वेळ मिळेल तेव्हा हातात पुस्तक असे माझ्या. बाबुराव अर्नाळकरांचे महंताचे भूत पुस्तक वाचत रात्री २ वाजेपर्यंत भूतासारखीच जागले होते. त्यांच्या त्या झुंजार विजयाने एवढं वेड लावलं होतं की मरीन लाइन्सला झुंजार महाल कुठे आहे, तो शोधायचाही मी प्रयत्न केला. आता सांगितलं तर हसाल तुम्ही. माहीम स्टेशनजवळ झुंजारचे तळघरातले घर शोधले. एवढंच कशाला, मुंबई पुणे रस्त्यावर चौक गाव लागलं तेव्हाचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता. गांवदेवीला धनंजयांचे ऑफिस कुठे तेही शोधलं. इतकं झपाटल्यागत झालं होतं की मनातल्या मनात त्याचा सिनेमा काढायचाही निश्चित केलं होतं. आणि सीआयडी चित्रपट पाहिल्यापासून तर झुंजार विजयाकरता देवआनंद आणि शकीला ही स्टारकास्टही फिक्स केली होती.  पण ते मनातले मांडे मनातच राहिले.
        खूप वर्षांनंतर आमच्या दुकानात खरेखुरे डिटेक्टिव्ह आले असताना अण्णांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. ते गेल्यावर मी अण्णांना म्हटलंही, हे तर अजिबात धनंजयसारखे दिसत नाहीत. ते खरंच डिटेक्टिव्ह आहेत ना?... लेखकाने लिहिलेल्या गोष्टी, निर्माण केलेली पात्रं ही आपण प्रत्यक्ष जीवनात शोधायला लागतो. कधी ती गवसल्यासारखी वाटतात तर कधी चांगलीच फसगत होते आपली.
नायक
         अक्षर साहित्य ही अण्णांच्या कल्पक योजनांपैकी एक योजना. या माध्यमातून त्यांनी प्रसिद्ध लेखकांची पुस्तके अल्प किंमतीत काढली आणि विकली. त्यावेळचे लोकप्रिय आणि तरूणतरूणींचे लाडके लेखक म्हणजे ना. सी. फडके यांच्या काही कादंबर्‍या अण्णांनी केवळ ३ रूपये किंमतीला काढल्या. फडके त्यावेळी एका छापील पानाकरता ३० रूपये घेत असत. वाचनसंस्कृतीसाठी अण्णांनी असेही तुटीचे व्यवहार केले. घर आणि दुकानाचा परिसर एकत्र असल्याने साहजिकच मी दुकानातच घुटमळत होते. अनेकांची ये-जा सुरू होती. तितक्यात अण्णांनी मला हेमाताईला बोलावून आणायला पिटाळलं. हेमाताई म्हणजे हेमलता माईणकर. कलासक्त आणि साहित्यप्रेमी कॉलेजकन्या. अण्णा म्हणाले, हे बघ, कोण आलेत? ना. सी. फडके !”. आपल्या दैवताला साक्षात समोर बघून हेमाताईच्या नजरेत विलक्षण आनंद, अपार आदर दाटून आलेला मी पाहिला. तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. एकाच जागीच थिजल्यासारखी झाली होती ती. थोडी मोठी झाल्यानंतर मीदेखील फडक्यांच्या कादंबर्‍या वाचू लागले आणि चकीतच झाले. त्यांच्या नायकाचा पोषाख,  त्याचे वर्णन दुटांगी पंख्याचे धोतर , पांढरा शर्ट, कोट, रूबाबदार - हुबेहूब लेखकच. त्यावेळी माझ्या लक्षात आली हेमाताईची अशी अवस्था का झाली होती ते. आणि मलाही त्यावेळी हेमाताईच झाल्यासारखं वाटलं.  
                                                     सई शरच्चंद्र नाईकसाटम
                                                    (चारूशीला शंकरराव कुलकर्णी)       

No comments:

Post a Comment