Thursday, December 30, 2010

गूढकथांची वळणे.....वाटा....जयश्री कुलकर्णी


दिवाळी २००९............ जयश्री कुलकर्णी...... लोकसत्ता दैनिकाच्या वेबसाइटवरून साभार....
गूढ साहित्यापासून चित्रपटांपर्यंत, देशी रहस्यापासून विदेशी रहस्यापर्यंतचा एक प्रवास या विभागात...
गूढकथांची वळणे – वाटा
    माणसाला घाबरायला आणि घाबरवायला खूपच आवडते. अगदी लहान मूलही दारामागे लपून किंवा डोक्यावर चादर घेऊन मोठय़ांना भोअसा आवाज करून घाबरवते. या सहज प्रवृत्तीमुळेच गूढकथा, भयकथांचे माणसाला नेहमीच आकर्षण वाटत आले. या अनाकलनीय, असंभाव्य, अनपेक्षित आणि म्हणूनच रोमांचकारी विश्वातले अतक्र्य अनुभव कथारूपाने समोर येतात, तेव्हा तरल, संवेदनशील मनाच्या प्रत्येकाला ते एका विस्मयकारक, थरारक पातळीवर घेऊन जातात. साहजिकच या वाचनाची एक नशा वाचकाच्या जाणिवा काही काळापुरत्या बधिर करते. नित्याच्या जीवनातले तेच ते नीरस, अतिपरिचित प्रसंग वाचण्यापेक्षा अज्ञाताकडे नेणारा हा थरारक वाचन प्रवास माणसाला आवडतो.
अज्ञाताचे आकर्षण लहानांपासून थोरांपर्यंत सर्वानाच असते जे दिसते आहे, दृश्य आहे, त्याहीपेक्षा जे अदृश्य आहे, अज्ञात आहे, त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न माणूस नेहमीच करत आला. ज्योतिषी, मांत्रिक, तांत्रिक अतिंद्रिय शक्ती जागृत करण्यासाठीचे कठोर, अघोरी, उपाय यांचा वापर  त्यासाठी करण्यासही त्याने मागे पाहिले नाही. काहीतरी अमानवी, अचाट, अमंगल शक्ती या सृष्टीत अस्तित्वात आहेत आणि त्या आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करतात. संकटे आणतात असा समज फार पूर्वीपासून म्हणजे जंगलात वास्तव्य करणाऱ्या आदिवासींच्या काळापासून माणसाच्या मनात होता. त्यामुळे या साऱ्याबद्दल त्याच्या मनात भयही होतं आणि औत्सुक्यही! लहान मुलाला अंधारात जायची भीती वाटते. पण त्या अंधारात खरोखरच काय आहे ते पाहण्याची जिज्ञासाही त्याला स्वस्थ बसू देत नाही.    तसाच काहीसा हा   प्रकार    आहे.
भयकथा, गूढकथा फार पूर्वीच्या काळात दंतव्य पद्धतीतच होत्या. म्हणजे कडाक्याची थंडी, अंधार अधिकच गडद करणारी शेकोटी, तिच्या लाल- पिवळ्या ज्वाळांभोवती शेकत बसलेले लोक, गप्पांच्या ओघात कधी या काल्पनिक जगात शिरायचे हे त्यांनाही कळायचे नाही. भुते, चेटकिणी व त्यांच्या दुष्ट हेतूने प्रेरित कारवाया, दुष्ट माणसांनी तंत्रविद्येने प्रसन्न करून घेतलेल्या क्रूर देवता यांच्या कथा सहजच गुंफल्या जात. कुणी एक त्या रंगवून सांगे आणि बाकीचे श्वास रोखून ऐकत असत. नंतर या कथा पसरतही जात. युरोपात त्या काळी बांधली जाणारी गढी किंवा किल्लेवजा घरे, बर्फ- थंडी यापासून बचाव करण्यासाठी बांधलेली बैठी, कोझी घरे त्यातला अंधारलेपणा, बुरुजासारखे भाग यांची भीती, सिमेटरीमध्ये (स्मशान) पुरलेले त्यांच्या नातलगांचे मृतदेह, त्यांच्या जिवंतपणी असलेले हेवे- दावे हे सारेच अशा कथांना जन्म घालत असल्यास नवल नव्हते.
         पूर्वी आदिवासींच्या काळात जंगलात अचानक लागणारे वणवे, कडकडाट करीत आगीच्या लोळाप्रमाणे जमिनीवर येणारी वीज, तिच्या आघाताने भस्मसात होणारा आजूबाजूचा प्रदेश, भूकंप, ज्वालामुखीमुळे सारा डोंगर गडगडाट करीत आग ओकू लागणे आणि त्याचा तप्त लाव्हारस जमिनीपर्यंत वाहत येणे, डोंगरातून येणारे प्रतिध्वनी, साथीच्या रोगांनी पटापट मरणारी माणसे  प्राणी या साऱ्या भयचकित करणाऱ्या घटनांमागचा कार्यकारणभाव व शास्त्रीय सत्य माणसाला माहीत नव्हते. त्यामुळे या साऱ्यांबद्दलची कमालीची दहशत त्यांच्यात होती. त्यामुळे या विनाशी शक्तीचा कोप दूर ठेवण्यासाठी त्यांची काल्पनिक प्रतिमा तयार करून ते तिलाच खूश ठेवण्याचा प्रयत्न करीत. त्यासाठी तिच्यापुढे नृत्य, संगीत या कला सादर करीत. बळी देण्याच्या मार्गाचाही अवलंब करीत.
           युरोपातही बर्फवृष्टी किंवा थंडीचा मोसम आणि त्यामुळे मृत्यूच्या संख्येत होणारी वाढ यांची भीती लोकांमध्ये होती. त्यामुळे लाकूडफाटय़ासाठी जंगलात गेलेली माणसे रस्ता चुकून भरकटल्यामुळे किंवा हिमवादळामुळे परत आलीच नाहीत तरी त्यांची पाशवी शक्तींनीच शिकार केली असे त्यांना वाटे. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात आर्यलडमध्ये हॅलोवीन या सणाचा प्रारंभ याच कल्पनेतून झाला. येथे राहणारे सेल्टिक वंशाचे लोक हे मृत्यूनंतरच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारे होते. उन्हाळा व हिवाळा या दोन ऋतूंमधला संधिकाल असलेल्या ३१ ऑक्टोबर या दिवशी यमलोक व मृत्युलोक यातील सीमारेषा धूसर होतात असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळे मृत आत्म्यांचा पृथ्वीवर येण्याचा मार्ग सुकर होतो आणि ते आपल्या अतृप्त इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी पृथ्वीवरील लोकांना अनेक तऱ्हांनी त्रास देतात, अशी त्यांची अंधश्रद्धा होती. त्यामुळे या दिवशी मृतात्म्यांना खूश ठेवण्यासाठी अन्न-धान्य किंवा बळी घराबाहेर ठेवणे आणि त्यांना पिटाळून लावण्यासाठी तेथेच स्केअर कोदेखील ठेवणे, तसेच चेहरे भयाण रंगवून रात्रभर गावात आरडाओरड करीत हिंडणे, अशा प्रकारचा हॅलोवीनसण ते साजरा करीत आजही अमेरिकेत ट्रिक ऑर ट्रिटया स्वरूपात हा सण साजरा केला जातो व मृतात्म्यांनी घरात प्रवेश करू नये म्हणून घराची भयावह सजावटही केली जाते. (या सजावटीमुळे भुतांना उलट ते परिचित व अ‍ॅट होम फिलिंगदेणारे वाटून ते आत येतील, अशी शंका या मंडळींना का येत नाही हे कोडेच आहे.)
         या तोंडातोंडी पसरणाऱ्या भयकथांना पुढे तुरळक प्रमाणात लिखित स्वरूप प्राप्त झाले. ग्रीसमध्ये सोफोक्लिसने रंगवलेल्या भयानक, रौद्र कहाण्यांचा आणि युरोपमध्ये दहाव्या शतकात बिओल्फने रचलेल्या भयकथांचे तुरळक उल्लेख उपलब्ध आहेत. मात्र मेरी शेलीने लिहिलेली फ्रँकेस्टाइन ही बहुधा गूढतेवर आधारित पहिली कादंबरी मानली गेली. पण वस्तुत: या कादंबरीचे स्वरूप विज्ञान कथा (Science fiction) असे आहे.
          आपल्याकडेही म्हणजे भारतात भयकथांचा उगम शेकोटी भोवतीच्या गप्पांत किंवा पावसाळ्या, अंधाऱ्या रात्री मिणमिण जळणाऱ्या कंदिलाच्या पिवळ्या उजेडात, घरातल्या व शेजारच्या मंडळींच्या उपस्थितीत सांगितलेल्या कहाण्यांमध्येच आहे. कोकणात तर याचे पीक अमापच. या साऱ्या कथांमध्ये कुठल्याशा किल्ल्याचे भग्नावशेष, ओसाड घर, पडकी विहीर यामधील भुताटकी असे. पाणंदीतून चालताना आलेले विचित्र अनुभवकुणाला दिसणारी वेताळाची पालखी, त्यातील भुतांनी धरलेले पलीते, हडळी किंवा पिंपळावरचा मुंजा, चकवा यांच्या गोष्टी सांगितल्या जात. बहुधा यात भासाचा किंवा गैरसमजाचाच भाग जास्त आणि कल्पनेच्या भराऱ्याच अधिक असत. पण मंडळी गुंगून जात एवढे मात्र खरे. पुष्कळदा अशा कथांचा जन्म अतिउत्साही मंडळींच्या संरक्षणासाठीसुद्धा होत असे. या जागांपासून त्यांना धोका येऊ नये. जीव-जिवाणू डसू नये. हा विचार आहे. पण अशा तऱ्हेच्या भूतकथा सांगणाऱ्याला मिळणारे महत्त्व आणि मान यामुळे त्या रचण्याचा लोकांचा उत्साह वाढला. त्यांची लोकप्रियताही वाढली.
          आपल्याकडील भयकथांचा इतिहास मात्र फारसा जुना नाही. पुराण काळातील साहित्यात अद्भुतता, चमत्कार, प्राण्यांनी मानवी वाणीने बोलणे, यक्ष, किन्नर, राक्षस यांचे अस्तित्व व त्यांच्या चकित करणाऱ्या कथा यांची रेलचेल होती. ऋषीमुनींनी दिलेले अद्भुत वर आणि शापही होते. पण मृतात्म्यांचा वावर त्यात नव्हता. अद्भुततेचा स्पर्श आपल्या साहित्याला झाला, तो अगदी अलीकडच्या काळात. नाथमाधवांनी वीरधवलही पहिली अद्भुतरम्य कादंबरी लिहिली. या कादंबरीने मोठी लोकप्रियता मिळवली. लोकांना त्यांच्या लेखनाची अगदी चटक लागली. अशाच प्रकारच्या दोन कादंबऱ्या पुढे शशी भागवतांनी दिल्या. मर्मभेद आणि रतप्रभा या दोन्ही कादंबऱ्यांमध्ये राजाचे किंवा राजपुत्राचे कट-कारस्थानापासून रक्षण करण्यासाठी केलेले अद्भुत साहस, किल्ल्यातील गुप्त भुयारांमुळे पाहता पाहता अदृश्य होणारी माणसे, ऐयार विद्या म्हणजे अत्यंत थोडय़ा वेळात वेशभूषेत व रंगभूषेत बदल करून वेगळीच व्यक्ती समोर आणणे, तत्कालीन शस्त्रास्त्रांनी लढाया करणे, निरनिराळ्या रसायनांचा लेप शरीरावर देऊन विलक्षण परिणाम साधणे अशा अद्भुतरम्य गोष्टी असत. एखाद्या तरुणाचे जराजर्जर वृद्धात रूपांतर करणारी ही ऐयार विद्या लोकांना आवडली. या लेखकाने काही पाश्चात्त्य संकेतांचाही उपयोग केला. लांडग्याचे अशुभ ओरडणे किंवा त्याच्यात मृतात्मा असणे वगैरे.
         पाश्चात्त्य भयकथांचा जन्म त्या मानाने जुना आहे, १८४० सालच्या आसपास एडगर अ‍ॅलन पोने लिहिलेल्या कथा, स्टीदन्सची जेकील अ‍ॅण्ड टाईडआणि स्टोकर या लेखकाने लिहिलेल्या ड्रॅक्युलाच्या कथा यांना त्या त्या काळात खूपच प्रसिद्धी व वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एकाकी गढी, उदास आसमंताने तिला दिलेली गूढतेची डूब, शवपेटिकेचे झाकण करकरत उघडणे आणि त्यातून बाहेर येणारा सुळे असलेला ड्रॅक्युला लोकांच्या मनावर भयाची मोहोर उठवून गेला. माणसाचे रक्त पिणारा हा ड्रॅक्युला त्यांना वश करण्यासाठी निरनिराळी रूपे कशी घेतो, गोड बोलण्याने कसे फसवतो अशा कथा नंतर अनेक लिहिल्या गेल्या. पुढे त्यांचे भयपटही झाले.
          युरोपात तसेच ऑस्ट्रेलियात गुलामगिरीची प्रथा होती. या गुलामांना अमानुष वागणूक दिली जाई व त्यांच्याकडून कष्टप्रद कामे करवून घेतली जात. त्यांनी व त्यांच्या असंतुष्ट, क्रुद्ध स्त्रियांनी त्यांना ज्ञात व अवगत असलेल्या अघोरी करणीचा उपयोग करून घेतलेल्या सुडाच्या कथा .. १७५० च्या आसपास या दोन्ही राष्ट्रांत प्रसृत झाल्या.
            इजिप्तमधील ममीज हाही असाच भीतीदायक प्रकार होता. राजघराण्यातील मृत व्यक्तींना पुरण्यासाठी त्यांचा वापर होई. त्यांच्या शवांना टिकवण्यासाठी रासायनिक लेप दिले जात. तसेच त्यांचे आवडते दागिने, मद्य, खाद्य एवढेच नव्हे तर आवडत्या दास- दासींनाही त्यांच्याबरोबरच पुरण्यात येई. अशा या भयानक प्रथा म्हणजे भयकथांसाठी असलेला कच्चा मालच म्हणावा लागेल. तो पाश्चात्त्य देशात भरपूर होता. आफ्रिकेतील ब्लॅक मॅजिक व चीनमधील ड्रॅगन सीरीज त्या काळी प्रसिद्ध होत्या. शेक्सपिअरच्या मॅकबेथ नाटकातही भयाचा थरार होता. तर हॅम्लेटमध्ये समंधाचा वावरच होता.
.. १७४३ सुमारास रॉबर्ट ब्लेअर या भयकथालेखक पुढे आला. या काळात मृत्यूनंतर होणारा आत्म्याचा प्रवास, पुनर्जन्म, मागील जन्माची स्मृती, स्वर्ग- नरक या कल्पना आणि या दोन्हीच्या मध्ये झालेली त्रिशंकूसारखी स्थिती हे विषय हाताळले गेले. सैतानाला आपल्या स्वार्थी हेतूच्या पूर्ततेसाठी आत्मा विकणेहा एक विषय नंतर लोकप्रिय झाला. वाईट शक्तींना वश करून घेण्याची विद्या व त्यासाठी त्यांना आपल्या आत्म्याचेच आमिष दाखवणे हा प्रकार या कथांमध्ये होता. १८१८ साली जोहान्स फॉस्टस या जर्मन लेखकाने अशा प्रकारची कथा लिहिली.
           यानंतरच्या भयकथा, गूढकथा अधिक सफाईदार बनल्या. त्यातील विषयांचे वैविध्यही जाणवणारे होते. परामानसशास्त्राचा अभ्यास व भुताच्या अस्तित्वाचे पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न या काळात झाले. यातूनही काही विषय या वाङ्मयप्रकाराला मिळाले. एम. आर. जेम्स, ले फानू, बिअर्स, लवक्राफ्ट ब्लॅकवुड हे काही गाजलेले भयकथा, गूढकथा लेखक आहेत. गमतीचा योगायोग असा की भयकथांच्या विश्वात रॅम्से कॅम्प्बेल याचे काम उल्लेखनीय मानले गेले. तर  भारतीय भयपटात रामसे बंधूंचे योगदान मोठे ठरले.
           थोडक्यात पाश्चात्त्य भयकथा सतराव्या शतकापासून लिहिल्या गेल्या असल्या तरी मराठीतील भयकथांचा इतिहास त्या मानाने अलीकडचा म्हणजे फार तर पंचाहत्तर वर्षांपासूनचाच आहे. पण या कथांच्या रचनेतील हळूहळू वाढत जाणारे गूढ किंवा भय, थरार तसेच अकल्पित व असंभाव्य घटनांनी वाचकाला बसणारा धक्का हे सारे पाश्चात्त्य भयकथांइतकेच सफाईदार आणि वाचकाला खिळवून ठेवणारे आहे. मात्र पाश्चात्त्य व भारतीय किंवा मराठी भयकथा यात वातावरणनिर्मितीच्या किंवा संकेत वापरण्याच्या दृष्टीने निश्चितच फरक होता. () गढी, किल्लेवजा इमारती, भुयारे, भग्नावशेष, दफनभूमी इथे पाश्चात्त्य कथा सहसा घडतात. आपल्याकडे ओस पडलेले एकाकी वाडे, पडक्या व आटलेल्या विहिरी, एखादे शेत किंवा कधी राहत्या जागेमध्येही अंधारलेले माजघर, तळघर किंवा पोटमाळा इत्यादींचा यासाठी उपयोग होतो. () त्यांच्या कथांत लांडग्याचा वावर किंवा आरोळी, शवपेटिका, वटवाघळे, तेरा हा आकडा, . अशुभ गोष्टी येतात. आपल्याकडे कुत्र्याचे अपरात्री विव्हळून रडणे, घुबडाचा घुत्कार, टिटवीचे ओरडणे, स्मशान, . गोष्टींना वातावरणनिर्मितीसाठी आणले जाते. मृत आत्म्याचा वावर कुत्र्यांना जाणवतो, म्हणून ती रडतात असा आपल्याकडे समज आहे. () यावरील उपाय म्हणून चर्चमध्ये जाणे, बायबल या पवित्र ग्रंथाची अमंगलास भीती वाटणे, मृतात्म्यांना भीती दाखवण्यासाठी क्रॉसचा उपयोग करणे, बळी देणे, . गोष्टींचा पाश्चात्त्य लेखक उपयोग करतात, तर आपल्याकडे होम, संरक्षक मंत्राचा जप, पवित्र भस्म, तीर्थ यांचे शिंपण करणे, रुद्राक्ष माळा वापरणे, घराला व खिडक्यांना बाहेरून लसणाच्या कुडय़ांचे तोरण बांधणे, स्वस्तिक चिन्ह दारावर ठोकणे, प्रवेशद्वारावर विघ्नहारी गजाननाची प्रतिमा बसवणे, या गोष्टी भुता-खेतांपासून संरक्षण मिळवण्यासाठी वापरल्या जातात. एखाद्या वास्तूला किंवा व्यक्तीला या उपायांनी संरक्षण दिले जाते. अमंगल शक्ती या मंगल शक्तींपुढे, देवापुढे व देवाची भक्ती करणाऱ्यापुढे निष्प्रभ ठरतात हे महत्त्वाचे गृहीतक यामागे आहे. काही वेळा काळ्या बाहुलीचा http://www.loksatta.com/images/stories/newlok/diwali2009/dw59.jpgकिंवा मायथॉलॉजिकल भयानक प्रतिमोचादेखील वास्तूसाठी उपयोग केला जातो. नव्या गाडीला अमंगळापासून संरक्षण देण्यासाठी काळी बाहुली, लिंबू-मिरची किंवा चपलांचे लहानसे जोड गाडीत किंवा बॉनेटखाली टांगले जातात. यात दुष्ट शक्तींना घाबरवून पळवून लावण्याचा प्रयत्न दिसून येतो. सहाव्या शतकातील सेल्टिक वंशाच्या आयरिश लोकांच्या मानसिकतेत (हॅलोवीन सण आणणारे) आणि आपल्या आधुनिक विचारसरणीत याबाबतीत काहीच फरक पडला नाही का असे मनात आल्याशिवाय राहात नाही. लहान बाळाला तीट लावणे किंवा त्याची दृष्ट काढणे हे प्रकारही यातलेच. () अशा गोष्टींमध्ये येणारे खलप्रवृत्तीचे लोक हे बहुधा तिरसट, एकटे राहणारे, स्वत:बद्दल गुप्तता बाळगणारे व रहस्यमय असतात. त्यांचे रूप तिरस्करणीय, आवाज खर्जातला किंवा किरकिरा, डोळे वटारलेले किंवा अत्यंत थंड व त्याहीपेक्षा म्हणजे विखारी असतात. याबाबत मात्र बरेच साम्य दोन्हीकडील कथांत दिसून येते. () सृष्टिनियमांच्या विरुद्ध असलेल्या वाईट गोष्टी ते घडवून आणतात व सामान्यांच्या आयुष्यात पेच निर्माण करतात.
मराठीतील भयकथांत भयंकर समस्येत अडकलेले स्त्री-पुरुष वेगवेगळ्या स्तरातील आणि बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्व प्रकारचे आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात अकल्पितपणे उद्भवलेल्या गूढ भयकारी घटनांचा त्यांच्या बुद्धी व शक्तीनिशी जो सामना केला त्याचेच प्रत्ययकारी वर्णन या कथांतून सामोरे येते. काहींना यातून सहीसलामत बाहेर पडण्याचा उपाय सापडतो तर काहींना हारही पत्करावी लागते. तरीही अपरिचित विश्वातील जगावेगळ्या नियमानुसार घडणारे हे संघर्ष, त्यातील यशापयशाची आंदोलने वाचकाला सतत उत्कंठेच्या व थराराच्या चरमसीमेवर नेऊन ठेवतात. त्यामुळे या प्रकारचे रोमांचकारी वाचन करायला लोकांना साहजिकच आवडते.
             पण सत्तर वर्षांपूर्वीच्या काळात रहस्यकथा, गूढकथा लिहिणे किंवा वाचणे हा वाया गेलेल्या, उनाड व रिकामटेकडय़ा लोकांचा उद्योग आहे असे समजण्याचा होता. त्यामुळे असे वाङ्मय वाचणाऱ्या वाचकांच्या मनात एक प्रकारची अपराधीपणाची जाणीव मूळ धरत होती. काही अपरिपक्व मनाच्या किंवा अंधश्रद्ध व्यक्ती या अंमगल शक्तींच्या संचाराचा लेखकाच्या शब्दांतून चित्रमय अनुभव घेत आणि इतके घाबरत की या शक्ती खरोखरच अस्तित्वात आहेत असा त्यांचा दृढ समज होई आणि मग या शक्तींच्या जवळ आपण मनाने गेलो, त्यांना मनात प्रवेश दिला म्हणजे आता त्या आपल्या घराचा उंबरा ओलांडून आत येतील अशी धास्तीही त्यांना वाटे. यामुळेही लोक आपण असे वाङ्मय वाचतो ही गोष्ट लपवून ठेवत.
हीच भावना समाजातही असल्याने आपल्याकडे उत्तम भयकथाकार असूनही आणि ते समर्थपणे अशा कथा पेलत असूनही या वाङ्मय प्रकाराला म्हणावी तशी प्रतिष्ठा मिळाली नाही. साहित्यिक मंडळींनी तर हा वाङ्मयप्रकार हाताळणाऱ्या लेखकांना वाळीत टाकले असेच म्हणावे लागेल. कुठल्याही साहित्य संमेलनामध्ये या विषयावर चर्चा-परिसंवाद झाले नाहीत.
          एखाद्या गूढकथाकाराला संमेलनाध्यक्षपदाचे राहो, पण गेला बाजार एखादे मानाचे पद कुणी दिल्याचे ऐकिवात नाही. आपल्या भरीव कामगिरीने या क्षेत्रात महत्त्वाचे स्थान असलेल्या नारायण धारपांना कुठलाही सन्मान देण्यात आला नाही. त्या दृष्टीने गूढकथाकार हे साहित्यातले किरवंतचठरले. म्हणजे शुभ घटनांचे पौरोहित्य करणारे भटजी जसे सन्मान्य वागणूक मिळवतात व मृत्यूनंतरचे विधी करणाऱ्या, श्राद्ध-पक्षाला जेवायला येणाऱ्या भटजींना किंवा किरवंतांना लोक जी वागणूक देतात तसला प्रकार याबाबत दिसतो. हा वाङ्मय प्रकार त्याच्या वेगळेपणामुळे वाचकप्रिय ठरला असला तरी ही सत्य परिस्थिती आहे.
पण या वाङ्मय प्रकाराला मानाचे स्थान देणारे, त्याचे महत्त्व समजणारे काही संपादक पुढे आले.धनंजयचे शंकरराव कुलकर्णी, ‘नवलहे खास या साहित्य प्रकाराला वाहिलेले मासिक काढणारे संपादक पितापुत्र श्री. अंतरकर, ‘अपराध’ ‘पाठलागचे संपादक . . खाडिलकर यांचा उल्लेख याबाबत करणे संयुक्तिक ठरेल. आपल्या मासिकांमधून या प्रकारच्या कथांना प्रसिद्धी देणारे कै. माधव कानिटकर यांचाही या यादीत समावेश करणे योग्य ठरेल.
            या साहित्य प्रकारात विपुल लेखन करणारे, बिनीचे लेखक होते नारायण धारप. या लेखकाने इतक्या विविध प्रकारच्या कथा, एवढय़ा मोठय़ा संख्येने आणि सातत्याने लिहिल्या की थक्क व्हायला होते. त्यांना मराठीतील या गूढकथा प्रकाराचा अध्वर्यू म्हणायलाही हरकत नाही. त्यांनी लिहिलेल्या चंद्राची सावली, पारंब्यांच्या जगात व फायकसची अखेर या कादंबऱ्यांनी त्या काळात खळबळ उडवून दिली होती. त्य कादंबऱ्यांची जबरदस्त मोहिनी त्या वेळी वाचकांवर http://www.loksatta.com/images/stories/newlok/diwali2009/dw60.jpgहोती. ते वाचताना वाचक भयचकीत व्हायचा, पण हातून कादंबरी सोडवतही नसे. सुमारे ८५ भयकथा त्यांनी लिहिल्या आणि त्या सर्व माणसाला भयकंपित करणाऱ्या होत्या.
अमंगल शक्तींचा सामान्यजनांच्या जीवनातला प्रवेश त्यांनी फार थरारक पद्धतीने मांडला. कुणातरी तांत्रिकाने दुष्ट हेतूने आपल्या सज्जन विरोधकावर सोडलेल्या अमंगल शक्ती आणि त्यांचा नि:ात  हा विषय काही कथांचा होता. () पण ज्यात भूत, प्रेत, आत्मा नाही अशाही अनेक कथा त्यांनी रचल्या. माणसाच्या मनातल्या काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, द्वेष इ. विकार अतितीव्र झाले की त्यांचे स्वरूप विखारी होते आणि त्यांचा इतरांना त्रास होऊ शकतो. अशा विखारी विकारांचाही त्यांनी आपल्या कथांसाठी उपयोग करून घेतला आणि अस्सल भयकथा दिल्या. () तसेच मानसशास्त्रातील काही मनोविकारांचाही त्यांनी या कथांमध्ये वापर केला. स्किझोफ्रेनिया, स्प्लिट पर्सनॅलिटी (द्विमनस्कता), स्मृतिभ्रंश (अल्झायमर), संशयग्रस्तता (पॅरानॉइया) अशी काही नावे सांगता येतील. मंडईत भाजीसाठी आलेल्या सामान्य माणसाची स्मृतीची कवाडे कशी एकेक करीत बंद होऊ लागतात आणि अखेरीस आपण कोण, कुठे आणि कशासाठी आलो याचेही त्याचे भान हरपते. हा त्याचा साराच मानसिक प्रवास भयप्रद आहे. दोन सख्ख्या बहिणीतील द्वेषाची कथाही त्यांनी लिहिली. तो द्वेष पेलवत नाही. रस्त्यात दिसणारी माणसे आपल्याकडे बोटे दाखवतात, गटाने उभी राहिलेली माणसे आपल्याबद्दलच चर्चा किंवा कट करतात, अशा संशयाने ग्रस्त असलेला एक मनुष्य खिडक्यांवर जाड पडदे टाकून स्वत:ला बंदिस्त करून घेतो आणि हळूहळू त्याचा मेंदू या संशयाने पछाडल्याने भरकटला जातो, हे चित्रणही अंगावर काटा उभा करणारे आहे. एखाद्या रटरटणाऱ्या उकळत्या रसायनासारखा त्याच्या हास्याचा आवाजतेवढा त्या खोलीत उरतो, अशी उपमा त्यांनी दिली आहे.
           गूढकथा प्रकारातील अशा या बहुआयामी लेखकालादेखील त्याच्या हयातीत कोणाचेही लक्षणीय पुरस्कार किंवा मान मिळाले नाहीत किंवा एकंदरीतच या वाङ्मयाला व त्यांच्या लेखकांना उपेक्षा सहन करावी लागली याची निश्चितच खंत वाटते.
              या साहित्य प्रकारात महत्त्वाचे व ताकदीचे योगदान देणारे दुसरे लेखक म्हणजे श्री. रत्नाकर मतकरी. त्यांनीही आपल्या विशिष्ट शैलीत अनेक गूढकथांचे लेखन करून भरपूर पुस्तके लिहिली. यात गहिरे पाणी, खेकडा, फाशी बखळ, कबंध, संभ्रमाच्या लाटा, मध्यरात्रीचे पडघम, मृत्युंजयी, अवचिन्ह आणि निजधाम अशी वाचकप्रिय पुस्तके आहेत.
           १९७६ च्या सुमारास श्री. गजानन क्षीरसागर हे भयकथाकार पुढे आले. त्यांची चित्तवेध, विश्वसंहार व अंधारवादळ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. श्री. यशवंत रांजणकर हेही कसलेले गूढकथाकार, त्यांच्यामहामृत्युंजयाचा जपआणि विदूषकया कथा विलक्षण आहेत. रांजणकरांचीरात्र संमोहिनी’, ‘आल्फ्रेड हिचकॉक (The man who knew too much)  ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.
           याखेरीज सर्वश्री ग. रा. टिकेकर, निरंजन घाटे, दिवाकर नेमाडे यांचे विपुल लेखन आहे. घाटय़ांनी जास्ती करून विज्ञानकथांमध्ये योगदान दिले. श्री. आनंद अंतरकरांनी रानरातवाया नावाने प्रसिद्ध केलेला अनुवादित कथांचा संग्रहही वाचकप्रिय आहे. जयश्री कुलकर्णी म्हणजे मीही १९७० सालापासून अनेक गूढकथा/भयकथा लिहिल्या. मेहता पब्लिकेशन्सने या कथांचे दोन संग्रह प्रकाशित केले. मांजराची सावलीविषवल्लीअशी त्यांची नावे आहेत.
            या साहित्य प्रकारातील आणखीही काही कथालेखक अनवधानाने उल्लेख करायचे राहून गेले असतील. पण एक गोष्ट मात्र ठामपणे सांगावीशी वाटते की, आमचे हे मराठी लेखक समर्थपणे हा कथाप्रकार पेलू शकले. त्यांनी केलेली वातावरणनिर्मिती, चित्रदर्शी शैलीत केलेला कथांचा विस्तार, लोकांना श्वास रोखायला लावणारा होता, भयकंपित करणारा होता. मात्र संख्येने हे लेखक कमी होते आणि त्यामुळे हे भांडारही मोजके राहिले हे मात्र नक्की!

No comments:

Post a Comment