Saturday, October 9, 2010

प्रभाकर पेंढारकर यांचे निधन

पुणे
‘रारंगढांग’ या कादंबरीने आबालवृद्धांना वेड लावणारे तसेच ‘एका स्टुडियोचे आत्मवृत्त’ या पुस्तकाने आपले वेगळेपण सिद्ध करणारे ज्येष्ठ साहित्यिक, चित्रपट दिग्दर्शक व फिल्म्स डिव्हिजनमधील प्रयोगशील दिग्दर्शक प्रभाकर पेंढारकर यांचे आज येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. मराठी चित्रपटसृष्टीचे पितामह भालजी पेंढारकर यांचे ते पुत्र होत. फिल्म्स डिव्हिजनमधील नोकरीच्या काळातील अनुभवांवर आधारित रारंगढांगने मराठी साहित्यसृष्टीत कादंबरीलेखनाला नवीन आयाम दिला. ही कादंबरी भरपूर गाजली. तिच्या तब्बल १२ आवृत्त्या निघाल्या. या कादंबरीस वाचकप्रियतेबरोबरच राज्य पुरस्कारही मिळाला होता. प्रतीक्षा ही त्यांची पहिली कादंबरी होती. ‘चक्रीवादळ’, ‘अरे संसार संसार’, ‘चिनार लाल झाला’ या त्यांच्या कादंबऱ्यांनाही उत्तम वाचक प्रतिसाद लाभला होता. अलीकडेच त्यांचे ‘एका स्टुडियोचे आत्मवृत्त’ हे जयप्रभा स्टुडियोवर लिहिलेले पुस्तकही गाजत असून त्याचीही दुसरी आवृत्ती संपली आहे. ‘भाव तेथे देव’ (१९६१), ‘बाल शिवाजी’ (१९८६), ‘शाब्बास सूनबाई’ (१९८६) ‘प्रित तुझी माझी’, अशा गाजलेल्या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली आहे. फिल्म्स डिव्हिजनमध्ये असताना त्यांनी दिग्दर्शक या नात्याने अनेक दर्जेदार माहितीपट तयार केले होते. भालजी पेंढारकर व व्ही. शांताराम यांच्याबरोबर त्यांनी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.त्यांच्यामागे पत्नी व दोन कन्या असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रात्री वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.


(सौजन्य ः लोकसत्ता )

1 comment:

  1. Read This Post >>> http://chinhatheartblog.blogspot.com/
    Thanks,
    Chinha

    ReplyDelete